CP Radhakrishnan : महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाचे NDA चे उमदेवार, इंडिया आघाडीतून पहिली प्रतिक्रिया समोर
Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सीपी राधाकृष्णन यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केलं. जेपी नड्डा यांनी यांनी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर करताच इंडिया आघाडीतून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सीपी राधाकृष्णन हे अनुभवी नेते असल्याचं म्हटलं, आमच्या त्यांना शुभेच्छा असल्याचं ते म्हणाले.
संजय राऊत काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या राज्यपालांचं नाव जाहीर झालं आहे, सीपी राधाकृष्णन यांचं नाव घोषित झालं आहे, त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, असं मानत असल्याचं संजय राऊत म्हणाले. राधाकृष्णन हे वादग्रस्त नाहीत, त्यांना राजकारण आणि संघटनेचा अनुभव राहिलेला आहे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
सीपी राधाकृष्णन कोण आहेत?
महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव भाजपच्यावतीनं एनडीएचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं आहे. सीपी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत. त्यांनी भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 2003 ते 2006 दरम्यान काम केलं आहे. सीपी राधाकृष्णनन 31 जुलै 2024 पासून महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. यापूर्वीच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देखील भाजपनं पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती केलं होतं. त्याप्रमाणेच सीपी राधाकृष्णन यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संधी दिली आहे.
सीपी राधाकृष्णनं हे महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून येण्यापूर्वी झारखंडचे राज्यपाल होते. त्यावेळी त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार होता. पुद्दूचेरीच्या नायब राज्यपाल पदाचा कार्यभार देखील त्यांनी पाहिला आहे. सीपी राधाकृष्णननं यांनी 1998 आणि 1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोइंबतूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. राधाकृष्णनन यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात जनसंघ आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघातून केली होती.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2025 ही आहे. तर, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान 9 सप्टेंबर रोजी होणार आहे. एनडीएनं उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सीपी राधाकृष्णनन यांचं नाव जाहीर केलं आहे. एनडीएकडे 392 या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त संख्याबळ आहे. एनडीएच्या खासदारांचं संख्याबळ 427 इतकं आहे. आता त्यांच्याविरोधात इंडिया आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार ते पाहावं लागेल. तर, महाराष्ट्राच्या रिक्त होणाऱ्या राज्यपालपदावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कुणाची निवड करतात ते देखील पाहावं लागेल.
#WATCH | Delhi | On Maharashtra Governor CP Radhakrishnan announced as NDA's Vice Presidential candidate, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "...He is a very good personality, non-controversial. He has a lot of experience. I extend best wishes to him" pic.twitter.com/6oOhtOjqNB
— ANI (@ANI) August 17, 2025
























