Lockdown : 'मेरे प्यारे देशवासियो...'; तीन वर्षापूर्वी आजच्या दिवशी लागू झाला होता कोरोना लॉकडाऊन
Covid19 Lockdown Anniversary : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2020 रोजी देशभरात जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. भारतामध्ये जनता लॉकडाऊन लागून आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.
Coronavirus Lockdown Anniversary : 'मेरे प्यारे देशवासियो...' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशव्यापी लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. पंतप्रधान मोदी यांनी 24 मार्च रोजी संध्याकाळी 21 दिवसांच्या म्हणजेच 14 एप्रिलपर्यंतच्या टाळेबंदीची घोषणा केली होती. डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झाला. भारतात जानेवारी 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळाली.
24 मार्च 2020 ला लागू झाला होता लॉकडाऊन
डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर कोरोना व्हायरस जगभरात वेगाने पसरला. जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं. भारतात 22 मार्चला लॉकडाऊनच्या आधीची पायरी म्हणजे जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर 24 मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे देशातल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. मार्चमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढून 500 वर पोहोचली, त्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्याची घोषणा केली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, कारण अत्यावश्यक गोष्टी सुरू राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला होती. यावेळी जीवनावश्यक सोयी आणि सुविधा सुरूच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये, असं आवाहन पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.
भारतात कोरोना कसा पसरला?
चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी 26 डिसेंबर 2019 रोजी वुहान शहरात संक्रमक कोरोना विषाणू आढळल्याची माहिती दिली. 29 जानेवारी 2020 रोजी भारतातील पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळला. जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्च 2020 रोजी कोरोना विषाणूचा उद्रेककोरोनाचा उद्रेक हा जागतिक महामारी असल्याचे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण पुण्यामध्ये 9 मार्च 2020 रोजी आढळून आला. त्यानंतर मार्च महिन्यात देशात कोरोनाचा पहिला बळी गेला. कर्नाटकमधील एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
कोरोना काळात देशातील आरोग्य व्यवस्थेचं सर्वाधिक अपयश समोर आलं. अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. कोरोना विषाणूवर सुरुवातीला उपचार उपलब्ध नसल्याने जनता पार भीतीच्या सावटाखाली होती. मात्र. याकाळात देशातील ढिसाळ आरोग्य व्यवस्थेचा मोठा सर्वसामान्य नागरिकांना बसला. लॉकडाऊन काळात एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे कोरोनाच्या उपचारासाठी लागणारा लाखो रुपयांचा उपचार या कात्रीत सामान्य लोक अडकले होते. सरकारी आरोग्य सुविधांचा अभाव आणि पैशाच्या अभावी अनेकांना उपचार मिळाले नाहीत, यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला.