(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Updates: काळजी घ्या, कोरोना वाढतोय; महाराष्ट्रात काल 711, तर दिल्लीत 521 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
Covid 19 Case In India: देशात कोरोना प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. अशातच दिल्ली, महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये वाढ दिसून येत आहे.
Covid 19 Case In India: देशात अनेक राज्यांमध्ये कोरोना (Coronavirus) व्हायरसच्या प्रादुर्भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली (Delhi), महाराष्ट्र (Maharashtra) नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोना प्रादुर्भावात होणारी वाढ पाहता आरोग्य मंत्रालयानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच, आरोग्य मंत्रालयाने लोकांना सोशल डिस्टेंसिंग पाळण्याचं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं त्याचप्रमाणे, मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावात अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रात छगन भुजबळ कोरोनाबाधित झाले आहेत. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही मंगळवारी (4 एप्रिल) कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
मंगळवारी देशातील विविध शहरांमध्ये कोरोनाचे किती रुग्ण आढळले आहेत, ते पाहुयात...
महाराष्ट्रात नव्या 711 कोरोनाबाधितांची नोंद
मंगळवारी, महाराष्ट्रात 711 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 218 रुग्ण मुंबईत आढळले आहेत. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोना प्रादुर्भावामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3,792 आहे. राज्यात गेल्या सात दिवसांत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात सध्या कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 1.82 टक्के आहे. महाराष्ट्रात 3,792 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत सध्या 1,162 सक्रिय रुग्ण आहेत आणि पॉझिटिव्हिटी दर 13.17 टक्के आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा या सहा जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे.
दिल्लीत 521 नव्या रुग्णांची नोंद
देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची प्रकरणं समोर येत आहेत. गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनाच्या 521 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 216 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीतही एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सोमवारच्या तुलनेत सकारात्मकता दर 15.64 टक्के कमी झाला आहे. दिल्लीत सध्या 1710 सक्रिय रुग्ण आहेत. दिल्लीत गेल्या वर्षी 27 ऑगस्टनंतर मंगळवारी सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली.
राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत कोरोनाबाधित
गेहलोत यांनी ट्वीट करून कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाबाधितांमध्ये वाढ झाली आहे. मला स्वतःला सौम्य लक्षणांसह कोविडची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढील काही दिवस माझ्या निवासस्थानातून काम करत राहीन. तुम्ही सर्वांनी खबरदारी घ्या आणि कोरोना प्रोटोकॉलचे पालन करा."
वसुंधरा राजे यांनाही कोरोनाची लागण
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याची माहितीही त्यांनी ट्वीट करून दिली. वसुंधरा राजे यांनी ट्वीट केलं की, कोविडच्या तपासणीत माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी.
पंजाब आणि राजस्थानमध्ये परिस्थिती काय?
पंजाबमध्ये एकूण 73 कोरोना रुग्ण आढळले आहेत. राजस्थानमध्ये 29 नवे रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत कर्नाटकात 324 नवे रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.