नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका कायम आहे, तोच तिसऱ्या लाटेची देखील दाट शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका आहे हे देखील सांगितलं जातं आहे. या पार्श्वभूमीवर 'कोवॅक्सिन' लसीच्या 2 ते 18 वर्ष वयोगटातील फेज दोन आणि तीनच्या क्लिनिकल ट्रायलला  ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय)  मान्यता दिली आहे. येत्या 10-12 दिवसांत क्लिनिकल ट्रायल सुरू होईल, अशी माहिती  निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. 






ही क्लिनिकल ट्रायल 525 जणांवर होणार आहे. दिल्लीतील एम्स, पाटण्यातील एम्स आणि नागपूरच्या मेडिट्रिना मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे. कोरोना लसीशी संबंधित समितीच्या शिफारशींनुसार, भारत बायोटेकला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु करण्याआधी दुसऱ्या टप्प्याचा डेटा उपलब्ध करावा लागेल.


मुलांवर कोवॅक्सिनची चाचणी कशी होणार?


डीसीजीआयने ज्या शिफारशीला मंजुरी दिली, त्यानुसार चाचणीत 525 स्वयंसेवक असतील. त्यांचं वय 2 ते 18 वर्षांच्या दरम्यान असेल. इंजेक्शनद्वारे लसीचे डोस दिले जातील. पहिला डोसनंतर 28 दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येईल. कोवॅक्सिनच्या सामान्य चाचणीमध्येही दोन डोसदरम्यान 28 दिवसांचं अंतर होतं.


कोवॅक्सिनच्या निर्मितीला गती मिळणार


कोवॅक्सिन या लसीच्या निर्मितीला आता गती मिळणार असून गुजरातमधील अहमदाबादच्या तीन कंपन्यांनी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची निर्मिती करण्यासाठी काल (17 मे रोजी) करार केला आहे. या आधी आणखी सार्वजनिक कंपन्यांनी कोवॅक्सिनची निर्मिती करण्यासाठी करार केला आहे. त्यामुळे देशात लस निर्मितीला गती मिळणार आहे.  गुजरात सरकारच्या मालकीच्या गुजरात बायोटेक रिसर्च सेंटर आणि खासगी क्षेत्रातील कंपनी असलेल्या हेस्टर बायोसायन्स आणि ओम्नीबीआरएक्स बायोटेक्नॉलॉजी या कंपन्यांनी भारत बायोटेकशी कोवॅक्सिनच्या तंत्रज्ञान हस्तांतरणासंबंधी एका करार पत्रावर सह्या केल्या आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या