नवी दिल्ली : भारतात कोरोना संसर्गाविरोधात सुरु असलेल्या लसीकरण अभियानात दोन लसींचा वापर होत आहे. नागरिकांना सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन या लसींचे प्रत्येकी दोन डोस दिले जात आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा आहे. तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु केल्यानंतरही अनेक राज्यांमध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु होऊ शकलेलं नाही. याच दरम्यान एका सरकारी पॅनलने कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केली आहे.


सरकारच्या NTAGI या समितीने कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12 ते 16 आठवडे करण्याची शिफारस केली आहे. तर कोवॅक्सिनच्या डोसमधील अंतरात कोणताही बदल केलेला नाही. तर गर्भवतींच्या लसीकरणाबाबतही समितीने महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे.


सरकारी समितीने केलेल्या शिफारशी कोणत्या?


1. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमध्ये तीन ते चार महिन्याचं (12 ते 16 आठवडे) अंतर ठेवण्याची शिफारस सरकारच्या NTAGI समितीने केली आहे. तर कोवॅक्सिनसाठी कोणताही बदल नाही. कोवॅक्सिन लसीच्या दोन डोसमध्ये पहिल्या सूचनेनुसार 28 दिवसांचं अंतर असेल.


2. गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस ऐच्छिक आहे, त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तर बाळांना स्तनपान करणाऱ्या माता प्रसुतीनंतर कधीही लस घेऊ शकतात.


3. कोविड-19 पॉझिटिव्ह झालेल्या नागरिकांनी बरं झाल्यानंतर सहा महिन्यांनी लस घ्यावी, अशी शिफारसही NTAGI समितीने केली आहे.


2 ते 18 वयोगटासाठी कोवॅक्सिनच्या चाचणीला परवानगी


2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर भारत बायोटेकची कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची क्लिनिकल चाचणी घेण्यास औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. तज्ज्ञ समितीने 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोवॅक्सिन लसीच्या दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी शिफारस केली होती. त्याला आता डीजीसीआयकडून परवानगी मिळाली आहे. 525 स्वयंसेवकांवर ही चाचणी होणार आहे.