नवी दिल्ली : भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस कोवॅक्सिन भारत आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. हैदराबादस्थित लसी उत्पादक भारत बायोटेक प्रख्यात मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनाचा हवाला देत सांगितलं की,  कोरोना लसीकरणादरम्यान भारत आणि ब्रिटनमधील अनुक्रमे B.1.617 आणि B.1.1.7 सह कोरोनाच्या सर्व प्रमुख स्ट्रेनवर प्रभावी आहे हे सिद्ध झाले आहे. 






कंपनीच्या म्हणण्यानुसार हे संशोधन नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. भारत बायोटेकचे सह-संस्थापक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, 'कोवॅक्सिनला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे, प्रकाशित वैज्ञानिक संशोधन आकडेवारीही ही लस नवीन स्ट्रेनवर प्रभावी असल्याचे दर्शवते. त्यांनी पंतप्रधान कार्यालयासह अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्यासह काहींना ट्वीटमध्ये  टॅग केले आहे.




देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत कोवॅक्सिन लस महत्त्वाची भूमिका निभावत आहे. कोवॅक्सिन ही एक पूर्णपणे स्वदेशी लस आहे. या व्यतिरिक्त लसीकरण मोहिमेत सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड लसीचाही वापर केला जात आहे.


केंद्र सरकारकडून 20 कोटी डोसचं वितरण


भारत सरकारने आतापर्यंत राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य 20 कोटी 28 लाख 09 हजार 250  लसींच्या मात्रा  दिल्या आहेत. यापैकी 14 मे 2021 पर्यंतच्या वाया गेलेल्या लसींसह एकूण  मात्रांपैकी सरासरी 18 कोटी 43 लाख 67 हजार 772 मात्रा (काल सायंकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या  उपलब्ध आकडेवारीनुसार) दिल्या गेल्या आहेत. 1.84 कोटीहून अधिक कोविड लसींच्या मात्रा  (1,84,,41,478) अद्याप राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत. मात्रांची उणे संख्या  दर्शविणाऱ्या  राज्यांतील लसींच्या मात्रा, सशस्त्र दलांने पुरविलेल्या लसींच्या मात्रांशी जुळत  नसल्यामुळे पुरविल्या जाणाऱ्या  लसींच्या मात्रांपेक्षा जास्त वापर झालेला (अपव्यय समाविष्ट) दर्शवित आहेत. याव्यतिरिक्त, जवळपास 51 लाख (50,95,640) लसींच्या मात्रा वितरीत करणे  प्रस्तावित असून पुढील  3 दिवसांत त्या  राज्य / केंद्रशासित प्रदेशांना प्राप्त होतील.