नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बाधितांची आकडेवारी काहीशी कमी होताना दिसत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेपासून सावध राहण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय सरकारकडून आखले जातायेत. अशात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिंगापूरमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन लहान मुलांसाठी घातक असल्याचं म्हटलं आहे. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन भारतात तिसऱ्या लाटेच्या रुपात येऊ शकतो, असा इशाराही अरविंद केजरीवाल यांनी दिला होता. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर सिंगापूर सरकारने आक्षेप घेतला असून त्यांनी भारतीय उच्चायुक्तांकडे आपला आक्षेप नोंदवला आहे. 


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून सिंगापूरची हवाई वाहतूक तात्काळ थांबवण्याचं आवाहन मंगळवारी अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केलं होतं. तसेच लहान मुलांना लस उपलब्ध होण्याच्या पर्यायांवर प्राथमिकतेच्या आधारावर काम होणे गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. 






दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर सिंगापूर सरकारने आक्षेप घेतला असून सिंगापूरातील भारतीय उच्चायुक्तांकडे आपला कडक शब्दात निषेध नोंदवला आहे. सिंगापूरच्या या तीव्र आक्षेपानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उल्लेख केल्याप्रमाणे कोणताही सिंगापूर कोविड स्ट्रेन नाही अशी स्पष्ट भूमिका भारतीय उच्चायुक्तांच्या वतीनं घेण्यात आली आहे.


 






गेल्या काही दिवसांपासून सिंगापूरमध्ये कोरोनाच्या आकडेवारीत वेगाने वाढ होते आहे. या पार्श्वभूमीवर 14 मे रोजी सिंगापूरमध्ये लोकांना एकत्र येणे आणि तसेच गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने इतर गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. 


महत्वाच्या बातम्या :