अहमदाबाद : भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसीच्या निर्मितीला आता गती मिळणार असून गुजरातमधील अहमदाबादच्या तीन कंपन्यांनी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची निर्मिती करण्यासाठी करार केला आहे. या आधी आणखी सार्वजनिक कंपन्यांनी कोवॅक्सिनची निर्मिती करण्यासाठी करार केला आहे. त्यामुळे देशात लस निर्मितीला गती मिळणार आहे.
गुजरात सरकारच्या मालकीच्या गुजरात बायोटेक रिसर्च सेंटर आणि खासगी क्षेत्रातील कंपनी असलेल्या हेस्टर बायोसायन्स आणि ओम्नीबीआरएक्स बायोटेक्नॉलॉजी या कंपन्यांनी भारत बायोटेकशी कोवॅक्सिनच्या तंत्रज्ञान हस्तांतरणासंबंधी एका करार पत्रावर सह्या केल्या आहेत.
या तीन कंपन्या मिळून दर महिन्याला दोन कोटी कोवॅक्सिनची निर्मिती करणार असल्याचं समजतंय. गेल्या आठवड्यात निती आयोगाच्या डॉ.व्हिके पॉल यांनी सांगितलं होतं की, भारत सरकार आणि भारत बायोटेकच्या वतीनं आम्ही इतर कंपन्यांना लस निर्मितीसाठी आमंत्रित करत आहोत.
डॉ.व्हिके पॉल म्हणाले की, "देशातील लस निर्मितीमध्ये वाढ करण्यासाठी आपण हे पाऊल उचलत आहोत. यामध्ये इतरही खासगी कंपन्यांना सामावून घेण्यात आलं आहे. कोवॅक्सिनची निर्मिती केवळ बायो सेफ्टी लेव्हल-3 या प्रकारच्या प्रयोगशाळेत करता येऊ शकते. त्यामुळे त्याच्या तंत्रज्ञान हस्तांतरणाची गरज आहे."
देशात लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला असला तरी लसींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवतोय. त्यातही कोवॅक्सिन या लसीची निर्मिती कमी प्रमाणात होत असल्याने या लसीची मोठी टंचाई जाणवत होती. अनेकांना कोवॅक्सिनचा पहिला डोस दिल्यानंतर दुसऱ्या डोससाठी वाट पहावी लागत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे देशातील लस निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या माध्यमातून लसींचे उत्पादन वाढवण्यावर भर आहे. त्यामाध्यमातून देशातील लसीकरण लवकरात लवकर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या :