Coronavirus | देशातील परिस्थिती चिंताजनक, एकाच दिवशी विक्रमी 2.17 लाख नव्या रुग्णांची भर तर 1185 रुग्णांचा मृत्यू
Coronavirus Cases In India: देशात गेल्या 24 तासात आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णसंख्येची म्हणजे तब्बल 2.17 लाख नव्या रुग्णसंख्येची भर पडली आहे. एकूण कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत आता जगात दुसऱ्या स्थानी आहे.
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 2.17 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली असून 1185 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 1.18 लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. या आधी, बुधवारीही दोन लाखांच्या वर कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडली होती. त्यामुळे देशातली परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असल्याचं दिसून येतंय.
देशातील आजची कोरोनाची स्थिती
- एकूण रुग्णसंख्या : 1 कोटी 42 लाख 91 हजार 917
- कोरोनावर मात केलेले एकूण रुग्ण : 1 कोटी 25 लाख 47 हजार 866
- सध्याचे सक्रिय रुग्ण : 15 लाख 69 हजार 743
- एकूण मृत्यू : 1 लाख 74 हजार 308
- एकूण लसीकरण : 11 कोटी 72 लाख 23 हजार 509
देशातील कोरोनाचा मृत्यूदर हा 1.23 टक्के आहे तर रिकव्हरी दर हा 88 टक्के इतका आहे. एकूण अॅक्टिव्ह केसच्या प्रमाणात वाढ झाली असून ती 10 टक्क्याहून जास्त झाली आहे. कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतोय तर एकूण रुग्णसंख्येच्या बाबतील जगात दुसरा क्रमांक लागतोय.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
महाराष्ट्रात गुरुवारी 61,695 नवीन रुग्णांची भर पडली आहे तर 53,335 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.3 टक्के एवढे आहे. राज्यात गुरुवारी 349 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर 1.63 टक्के एवढा आहे. राज्यात एकूण 6,20,060 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
दिल्लीमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिल्लीत गुरुवारी 17 हजाराच्या जवळपास कोरोना रुग्णांची नोंद झाली असून त्यामध्ये 112 जणांना आपला प्राण गमावावा लागला आहे. दिल्लीमध्ये एकूण मृतांची संख्या आता 11,652 इतकी झाली आहे.
मुंबईमध्ये गुरुवारी कोरोनाच्या 8,217 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये 49 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मुंबईमध्ये आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही पाच लाख 53 हजार 159 इतकी झाली असून मृतांची एकूण संख्या ही 12,189 वर पोहोचली आहे.
महत्वाच्या बातम्या :