रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन
रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे नवी दिल्ली येथे एम्स रुग्णालयात निधन झाले. अधिवेशनासाठी काही दिवसांपूर्वी ते दिल्लीला गेले होते.
नवी दिल्ली : रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे नवी दिल्ली येथे एम्स रुग्णालयात निधन झाले. अधिवेशनासाठी काही दिवसांपूर्वी ते दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. निधन समयी त्यांचे वय 65 वर्षे होते. बेळगाव लोकसभा मतदार संघातून ते सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित कन्या असा परिवार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले होते.रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडत होते.रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यावर त्यांनी अनेक नवीन रेल्वे सुरू केल्या होत्या.अलीकडेच त्यांनी बेळगाव ते धारवाड व्हाया कित्तूर रेल्वे प्रकल्प मंजूर करून घेतला होता.बेळगावहून देखील त्यांनी अनेक रेल्वे सुरु केल्या होत्या.राजकीय क्षेत्रात एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते.लॉक डाऊनच्या कालावधीत त्यांनी हजारो कुटुंबांना रेशन वितरित केले होते.सुरेश अंगडी एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी इंजिनियरिंग,मॅनेजमेंट कॉलेज सुरू केले होते.