Coronavirus Cases Today : देशात 24 तासांत कोरोनाचे 27 हजार 553 रुग्ण; ओमायक्रॉनबाधितांचा आकडा 1525 वर
Coronavirus Cases Today in India : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 27 हजार 553 दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 284 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today in India : देशात कोरोनाच्या दैनंदिन आकड्यांसोबतच (Coronavirus) ओमायक्रॉनच्या प्रादुर्भावातही मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाचा नाव व्हेरियंट ओमायक्रॉननं जगासोबतच देशाचीही चिंता वाढवली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 27 हजार 553 दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 284 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात आतापर्यंत 1525 ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आल्या आहेत. जाणून घेऊयात देशातील कोरोनाची सद्यस्थिती...
आतापर्यंत 4 लाख 81 हजार 770 रुग्णांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून एक लाख 22 हजार 801 वर पोहोचली आहे. अशातच या महामारीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 81 हजार 770 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, काल (शनिवारी) 9249 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 84 हजार 561 रुग्ण कोरोनावर मात करुन बरे झाले आहेत.
आतापर्यंत 145 कोटींहून अधिक लसीचे डोस
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 145 कोटींहून अधिक अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत.काल (शनिवारी) 25 लाख 75 हजार 225 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत लसीचे 145 कोटी 44 लाख 13 हजार 5 डोस देण्यात आले आहेत.
देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 1525 रुग्ण
देशात आतापर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंटचे 1525 रुग्ण आढळून आले आहेत. देशात आतापर्यंत 23 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि राजधानी दिल्लीमध्ये आढळून आले आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ओमायक्रॉनचे 460 रुग्ण, दिल्लीत 351 रुग्ण तर गुजरातमध्ये 136 रुग्णांचा समावेश आहे.
देशातील ओमायक्रॉनची आकडेवारी
राज्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद
राज्यावरील कोरोनाचे (Coronavirus) संकट अधिक गडद होत असून आज रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. राज्यात काल (शनिवारी) तब्बल 9,170 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,475 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे झालेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली असून देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह