(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Cases Today : देशात 24 तासांत 7 हजार 579 नवे कोरोनाबाधित; तर 236 मृत्यू
Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 7 हजार 579 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात 236 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Coronavirus Cases Today : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Coronavirus) चा प्रादुर्भाव सुरुच आहे. दरम्यान, आता दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 7 हजार 579 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर देशात 236 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, देशात 543 दिवसांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. देशात सध्या एक लाख 13 हजार 584 सक्रिय रुग्ण आहेत. जाणून घ्या देशातील कोरोनाची सद्यस्थिती...
आतापर्यंत 4 लाख 66 हजार 147 रुग्णांचा मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल दिवसभरात कोरोनामुळे 12 हजार 202 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच या महामारीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 66 हजार 147 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 3 कोटी 39 लाख 46 हजार 749 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात गेल्या 24 तासात 656 नव्या रुग्णांची नोंद
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आता नियंत्रणात आल्याचं दिसून येतंय. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 656 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 768 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण 64,76,450 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण हे 97.68 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही कमी झाली असून त्याचे प्रमाण हे 2.12 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील 96,042 रुग्ण हे होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1033 रुग्ण हे संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 9,678 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे.
तीन लाख मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई पालिका सज्ज
राज्यात आता लहान मुलांच्या वयोगटासाठी लसीकरणाची सुरुवात करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबई महापालिकेनेही तीन लाख मुलांच्या लसीकरणाची तयारी केली असून राज्य सरकार आणि कोविड टास्क फोर्सची सूचना येताच या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
राज्यात आता शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात येत असून त्याचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. पण शाळा सुरु करण्यापूर्वी या मुलांचे लसीकरण करण्यात यावं यासाठी कोविड टास्क फोर्स आग्रही आहे. पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी अशा दोन टप्प्यांमध्ये शाळा सुरु करण्यासंबंधी राज्य सरकारच्या सूचना येण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्याकरता मुंबई महापालिकेनं तयारी दर्शवली आहे. तसं राज्य सरकारलाही कळवण्यात आलं आहे. शाळा सुरु झाल्यानंतर कोविड रुग्णसंख्या वाढलीच तरी महापालिका प्रशासन पूर्ण सक्षम आहे असे महापालिकेनं राज्य सरकारला कळवलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :