(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus : कोरोनाबाधितांची संख्या घटली, 10 रुग्णांचा मृत्यू; मात्र नव्या व्हेरियंटचा धोका कायम
Coronavirus Cases Today : देशात 2119 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे सक्रीय रुग्णांची संख्याही घटली आहे.
Coronavirus Cases Today in India : एकीकडे देशासह जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने (Corona New Variant) चिंता वाढवली असताना देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. ही किंचित घट दिलासादायक बाब असली तरी, कोरोनाचा धोका काही कमी झालेला नाही. देशात 2119 नवीन कोरोना रुग्णांची नोंद आणि 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सणासुदीच्या काळात कोरोनाच्या पाचव्या लाटेचा धोका घोघांवत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही नव्या व्हेरियंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. दरम्यान देशातील कोरोना रुग्ण घटणे यासह दुसरी दिलासादायक बाब म्हणजे सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे. गेल्या 24 तासांत 2,582 कोरोना रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत. देशात एकूण 4 कोटी 40 लाख 84 हजार 646 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत.
देशात 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
देशात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूमुळे 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे पाच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोना विषाणू संसर्गामुळे एकूण 5 लाख 28 हजार 953 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान देशातील सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या देशात 25 हजार 37 कोरोना उपचाराधीन रुग्ण आहेत. काल ही संख्या 26 हजार होती. 12 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच सक्रिय रुग्णांची संख्या 26 हजारांच्या खाली पोहोचली आहे.
Single-day rise of 2,119 new infections pushes India's COVID-19 tally of cases to 4,46,38,636, death toll climbs to 5,28,953: Govt
— Press Trust of India (@PTI_News) October 21, 2022
WHO कडून धोक्याचा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नव्या कोरोना व्हेरियंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ओमायक्रॉनच्या (Omicron) XBB व्हेरियंटमुळे प्रशासनासमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या नव्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहेत. कोरोनाचे नवे व्हेरियंट अतिशय संसर्गजन्य आहेत. सध्या XBB व्हेरियंटचा (XBB Sub-variant) धोका वाढताना दिसत आहे. जगभरात BF.7, XBB आणि BA.5 हे नवीन व्हेरियंट वेगाने पसरत आहे. चीन, इंग्लंडसह अनेक देशांमध्ये नवे व्हेरियंट वेगाने पसरत आहेत.
#Unite2FightCorona
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) October 21, 2022
➡️ 2,119 New Cases reported in last 24 hours. pic.twitter.com/NaId6WPV36
भारतात आढळलेले कोरोनाच्या XBB विषाणूचे रुग्ण
भारतात ओमायक्रॉनच्या (Omicron) XBB व्हेरियंटचे एकूण 84 रुग्ण आढळले आहेत.
- महाराष्ट्र : 18 रुग्ण
- ओडिशा : 33 रुग्ण
- पश्चिम बंगाल : 17 रुग्ण
- तामिळनाडू : 16 रुग्ण