Coronavirus Cases : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय; सलग चौथ्या दिवशी 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद
Coronavirus Cases : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय. सलग चौथ्या दिवशी देशात 40 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
Coronavirus Cases Today : भारतात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होताना दिसत आहे. सध्या भारतात 40 हजारांच्या आसपास नव्या कोरोनाबाधितांची दररोज नोंद केली जाते. सलग चौथ्या दिवशी देशात 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 39,361 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. 416 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 35,968 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी
देशात सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 11 हजार रुग्ण अद्यापही कोरोनावर उपचार घेत आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तीन कोटी 14 लाख 11 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 20 हजार 967 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 3 कोटी 5 लाख 3 हजार रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहेत.
43 कोटींहून अधिक कोरोना लसींचे डोस
आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 25 जुलैपर्यंत देशभरात 43 कोटी 51 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 18 लाख 99 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना लसीचे 45.37 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. आयसीएमआरनं दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 45 कोटी 74 लाख कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 11.54 लाख कोरोना लसींचे सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. काल (रविवारी) दिवसभरात राज्यात 6 हजार 843 नवीन रुग्णांचे निदान झालंय. तर 5 हजार 212 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 35 हजार 29 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे. राज्यात काल 123 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतेय
राज्यात सध्या अहमदनगर जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातही आता रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. काल सातारा 665, कोल्हापूर 582, सांगली 691, अशी रुग्णांची नोंद झालीय. तर भंडारा, वर्धा, यवतमाळ, नंदूरबार या जिल्ह्यात एकही नवीन रुग्ण आढळला नाही.
मुंबईत गेल्या 24 तासात 364 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 364 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या शहरात 7681 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, आज 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :