(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनाचा वेग मंदावला; गेल्या 24 तासांत 5221 नव्या रुग्णांची नोंद, एकूण मृतांचा आकडा 5.28 लाखांवर
India Coronavirus Cases : आरोग्य मंत्रालयानं (Ministry Of Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Case) संख्या 47 हजार 176 वर पोहोचली आहे.
India Coronavirus Cases : देशात कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 5 हजार 221 दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील एकूण बाधित रुग्णांचा आकडा वाढून 4 कोटी 45 लाख 50 इतका झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं (Ministry Of Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात अॅक्टिव्ह रुग्णांची (Active Case) संख्या 47 हजार 176 वर पोहोचली आहे.
सध्या देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावला असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी, कोरोनाचा धोका मात्र अद्याप टळलेला नाही. कोरोना प्रतिबंधक लसीचा (Dose) बूस्टर डोस (Booster Dose) घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर येत आहे. दरम्यान, लसीकरण झाल्यामुळे त्यांच्यात आढळलेली लक्षणं मात्र अत्यंत सौम्य असल्याचं दिसून येत आहे. लसीकरण झालेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली तरी अनेकजण अवघ्या आठवडाभरात कोरोनामुक्त होत असल्याचीही माहिती मिळत आहे.
#COVID19 | India reports 5,221 fresh cases and 5,975 recoveries in the last 24 hours.
— ANI (@ANI) September 12, 2022
Active cases 47,176
Daily positivity rate 2.82% pic.twitter.com/o24GqLeLO0
गेल्या 24 तासांत 30 लाख 76 हजार नागरिकांचं लसीकरण
देशात कोरोना लसीकरण मोहीम अजूनही सुरूच आहे. गेल्या 24 तासांत देशात 30 लाख 76 हजार 305 जणांना कोरोनाची लस मिळाली आहे. त्यानंतर लसीकरणाची एकूण संख्या 215 कोटी 26 लाख 13 हजार 49 वर पोहोचली आहे. तसेच, जर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीबाबत बोलायचं झालं तर, कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून आतापर्यंत 5 लाख 28 हजार 165 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमवला आहे.
रविवारी राज्यात 701 नव्या रुग्णांची नोंद
गेल्या चार दिवसांपासून राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. काल (रविवारी) राज्यात 701 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर तीन बाधितांचा आज मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी राज्यात 1076 कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर शुक्रवारी 955 रूग्णांची नोंद झाली होती. तर शनिवारी 734 नव्या रूग्णांची नोंद झाली होती. आज राज्यात 701 नव्या रूग्णांची नोंद झालीय. ही आकडेवारी पाहाता गेल्या चार दिवसांमध्ये रोज नव्या रूग्णांच्या संख्येत घट होत आहे.
सर्वाधिक सक्रिय रूग्ण मुंबईत
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या 6220 कोरोनाचे सक्रिय रूग्ण आहेत. सर्वाधिक सक्रिय रूग्ण मुंबईत आहेत. मुंबईत सध्या 1711 सक्रिय रूग्ण आहेत. त्यापाठोपाठ ठाण्यात 1437 तर पुण्यात 1370 सक्रिय रूग्ण आहेत. परंतु, राज्यासह मुंबईत देखील कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत रविवारी 187 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर 375 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 98.1 टक्के इतका झाला आहे.तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.