Sputnik V Vaccine : स्पुटनिक V लसीचे काही डोस एप्रिल अखेरपर्यंत भारताला मिळणार, वर्षाला मिळणार 85 कोटी डोस
स्पुटनिक V लस 91.6 टक्के प्रभावी असल्याचं डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने म्हटलं आहे. ही लस भारतात क्लिनिकट ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात असून डॉ. रेड्डीजने फेब्रुवारी महिन्यात लस आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी भारतीय औषध नियामकांकडे पाठवली होती.
मुंबई : भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींनंतर रशियाच्या स्पुटनिक V लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी मिळाली आहे. औषध निर्मिती क्षेत्रातील कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या लसीची निर्मिती आणि वितरण करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशात या लसीचे दरवर्षी 85 कोटी डोसेसची निर्मिती केली जाणार आहे. काही मर्यादित डोसेस एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत भारतात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे देशात सुरु असलेल्या लसीच्या तुटवड्याची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
स्पुटनिक V लस 91.6 टक्के प्रभावी असल्याचं डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने म्हटलं आहे. ही लस भारतात क्लिनिकट ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात असून डॉ. रेड्डीजने फेब्रुवारी महिन्यात लस आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी भारतीय औषध नियामकांकडे पाठवली होती. अखेर काल या लसीला मंजुरी मिळाली आहे.
Sputnik V लस घेतल्यानंतर दोन महिने दारुचे सेवन नको, रशिया सरकारचा नागरिकांना सल्ला
नागरिकांना या लसीचे दोन डोस घ्यावे लागतील. पहिला डोस घेतल्यानंतर 21 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागेल. लस घेतल्यानंतर 28 आणि 42 दिवसांमध्ये शरीरात रोगप्रतिकारक शक्ती विकसित होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे लसीचे दोन डोस घेणं आवश्यक असणार आहे. 'स्पुटनिक V ' चे लसीकरण सुरु झाल्यानंतर रशिया सरकारने आपल्या नागरिकांना दोन महिने दारुचे सेवन न करण्याचा सल्ला दिलाय. रशियाच्या या सल्ल्याने आता मद्यप्रेमींची चांगलीच गोची झाल्याचं दिसतंय. कोरोनाची लस घेतल्यानंतर दारुचे सेवन न करण्याच्या सल्ल्यामागे लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा उद्देश आहे असं रशियाच्या प्रशासनानं स्पष्ट केलंय.
भारतात सध्या स्थानिक पातळीवर कोविडच्या दोन लस तयार केल्या जातात. यात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सीन या लसींचा समावेश आहे. यानंतर आता स्पुटनिक V (डॉ. रेड्डी यांच्या सहकार्याने) या लसीला आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. तर जॉनसन आणि जॉनसन सहकार्याने बायोलॉजिकल ई, नोवॅवॅक्स लस (सीरम इन्स्टिट्यूट इंडियाच्या सहकार्याने तसे झाइडस कॅडिलाची लस आणि भारत बायोटेकची इंट्रानेसल या लसींना देखील परवानगी मिळू शकते.