Corona Vaccination : देशातील सर्वच लसी मोफत दिल्या नाहीत, सहा टक्के लसींवर पैसे आकारले
Corona Vaccination : देशातील 100 कोटी लसींचे डोस हे मोफत देण्यात आल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. पण खासगी हॉस्पिटलमध्ये देण्यात आलेल्या सहा टक्के डोसवर किंमत आकारण्यात आली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. त्यानिमित्ताने देशभरात जल्लोश साजरा करण्यात आला. हे सर्व डोस मोफत देण्यात आले असल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. पण केंद्राचा दावा हा चुकीचा असून त्यातील लसीचे सहा टक्के डोस हे खासगी हॉस्पिटल्समध्ये किंमत आकारुन देण्यात आले असल्याची माहिती 'द क्विंट' या संकेतस्थळाने दिली आहे.
देशात 100 कोटी डोसचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर या ऐतिहासिक घटनेच्या निमित्ताने देशाला संबोधन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "देशामध्ये कोरोना लसीच्या 100 कोटींचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला आहे. नागरिकांना देण्यात आलेले हे सर्व डोस पूर्णपणे मोफत देण्यात आले आहेत. त्यावर कोणतीही किंमत आकारण्यात आली नाही."
द क्विंट या संकेतस्थळाने केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिलेल्या माहितीता संदर्भ दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात 1 मे ते 22 सप्टेंबर या दरम्यान देण्यात आलेल्या एकूण डोस पैकी सहा टक्के डोस हे खासगी हॉस्पिटलमध्ये देण्यात आले आहेत. पण खासगी हॉस्पिटलमध्ये यावर हजारो रुपये आकारण्यात आले आहेत.
7 जूनला एक नोटिफिकेशन काढून केंद्र सरकारने देशातील लसीकरणाचे धोरण जाहीर केलं होतं. त्यामध्ये 75 टक्के लसी या सरकारकडून खरेदी करण्यात येतील तर उर्वरित 25 टक्के लसी या खासगी हॉस्पिटल्सना खरेदी करण्याची मुभा देण्यात येईल. त्यानंतर पंतप्रधानांनी देशवासियांना 21 जून रोजी संबोधन करताना सांगितलं होतं की, देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येणार आहे.
देशात 100 कोटी डोसचा टप्पा पार
देशातील लसीकरणाने 21 ऑक्टोबरला 100 कोटी डोसचा टप्पा ओलांडला. ही भारतासाठी गौरवास्पद कामगिरी असून हे यश देशातील 130 कोटी जनतेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. हे यश साध्य करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स, लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या, शास्त्रज्ञ तसेच आंत्रप्रुनर्स यांचं पंतप्रधानांनी आभार मानलं आहे. 21 ऑक्टोबर 2021 या दिवसाची इतिहासात नोंद केली जाईल असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
देशात कोरोनाच्या लसीकरणाला 16 जानेवारी 2021 रोजी सुरुवात झाली आणि पाहता-पाहता आज 100 कोटी डोस पूर्ण झाले. भारतातील अर्ध्याहून जास्त लोकसंख्येने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तसेच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीलाही मंजुरी मिळाली असल्याने येत्या काळात लसीकरणाच्या कार्यक्रमाला आणखी वेग येणार आहे.
देशातील लसीकरणाचे टप्पे कसे पार पडले?
- 16 जानेवारी 2021- लसीकरण सुरु
- 1 फेब्रुवारी 2021- 1 कोटी डोस
- 15 जून 2021 - 25 कोटी डोस
- 6 ऑगस्ट 2021 - 50 कोटी डोस
- 1 सप्टेंबर 2021- 75 कोटी डोस
- 21 ऑक्टोबर - 100 कोटी डोस
महत्वाच्या बातम्या :