हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनमुळे कोणताही धोका नाही, WHO च्या बंदीनंतर ICMR चं स्पष्टीकरण
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवर एम्स आणि दिल्लीतील तीन खासगी रुग्णालयांमध्ये कन्ट्रोल्ड स्टडी केली गेली आहे. या स्टडीमध्ये हे औषध कोरोनावरही काम करु सकते आणि त्याचे फार दुष्परिणामही नाहीत, असं समोर आलं आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचा वापर करु नये, अशा सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्लूएचओ) दिल्या आहेत. या औषधाचा वापर मलेरियाच्या रुग्णांवर उपचारासाठी होतो. या दरम्यान इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराने काहीही धोका नसल्याचं सांगितलं आहे.
आयसीएमआरच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं की, कोरोना व्हायरस नवीन आजार आहे. यावर ठराविक उपचार पद्धती नाही आणि यावर औषधही उपलब्ध नसून त्यावर संशोधन सुरु आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनवर एम्स आणि दिल्लीतील तीन खासगी रुग्णालयांमध्ये कन्ट्रोल्ड स्टडी केली गेली आहे. या स्टडीमध्ये हे औषध कोरोनावरही काम करु शकतं आणि त्याचे फार दुष्परिणामही नाहीत. मात्र हे औषध देताना रुग्णाची ईसीजी तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
कोरोनाबाधितांवर उपचारासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या क्लिनिकल ट्रायलवर बंदी; WHO चे आदेश
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर कशासाठी होतो?
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचं भारतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. मलेरियासारख्या आजारावंर उपचारासाठी या गोळ्यांचा वापर होतो. मलेरियाशिवाय या औषधाचा वापर आर्थरायटिसमध्येही केला जातो. अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी या गोळ्या दिल्या जात आहेत. याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत. त्यामुळे इतर देशातही या गोळ्यांची मागणी अचानक वाढली आहे. या गोळ्यांचा खास परिणाम सार्स-सीओव्ही-2 वर होतो. हा तोच व्हायरस आहे, ज्यामुळे कोविड-2 ची लागण होते. त्यामुळेच हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या कोरोना व्हायरसच्या रुग्णांना दिल्या जात आहेत.