देशातील 19 राज्यात एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू नाही, आरोग्य मंत्रालयाची दिलासादायक माहिती
देशातील गेल्या 24 तासांत 12,932 नवीन कोरोना प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि 108 लोकांचा मृत्यू झाला आहे. काल एकूण 11,764 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा कहर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 108 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले. पण देशातील 19 राज्यांमध्ये एकही कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.
अंदमान आणि नोकोबार बेटे, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, दादरा नगर हवेली आणि दमण दीव, दिल्ली, जम्मू काश्मीर, झारखंड, लडाख, लक्षद्वीप, मणिपूर, नागालँड, मेघालय, मिझोरम, ओरिसा, पुडुचेरी, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तर प्रदेश अशी ही 19 राज्ये आहेत.
देशात एक लाख 55 हजारांहून अधिक मृत्यू
देशातील गेल्या 24 तासांत 12,932 नवीन कोरोना प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि 108 लोकांचा मृत्यू झाला आहे. काल एकूण 11,764 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील एकूण सक्रिय रुग्णसंख्येपैकी 71 टक्के रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रात आहेत. देशात लसीकरणही सुरू आहे आणि आतापर्यंत सुमारे 70 लाख लोकांना लसी देण्यात आली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आता देशात एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 कोटी 8 लाख 71 हजारांवर पोहोचली आहे. तर एकूण 1 लाख 55 हजार 360 लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनावर मात करुन 1 कोटी पाच लाख 73 हजार लोक बरे झाले आहेत. आता देशात सक्रिय रूग्णांची संख्या वाढून 1 लाख 42 हजारांवर उपचार सुरू आहेत.
लसीकरणाची सद्यस्थिती
कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांची संख्या आज 68.26 लाखांवर पोहोचली आहे. आतापर्यंत लसीकरणाच्या 1,42,455 सत्रांमध्ये 68,26,898 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये 56,65,172 आरोग्य कर्मचारी(57.4%) आणि प्रमुख आघाड्यांवर काम करणाऱ्या 11,61,726 कर्मचाऱ्यांचा (13.2%) समावेश होता.