Corona Mask : सावधान... देशात कोरोना वाढतोय! 'या' राज्यांमध्ये पु्न्हा मास्क बंधनकारक
Corona Mask : सध्या देशात कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. मास्क मुक्ती, शाळा सुरु करणं, कार्यक्रमांवरील बंधनं हटवल्यानं कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली
Corona Mask : देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. दिल्लीसह हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्येही मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. तसंच पंजाब सरकारनं देखील लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा असा सल्ला दिला आहे. तज्ञांचं म्हणणं आहे की, सध्या देशात कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. मास्क मुक्ती, शाळा सुरु करणं, कार्यक्रमांवरील बंधनं हटवल्यानं कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता दिल्ली सरकारनं सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणारांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्लीमध्ये वाढत आहेत कोरोनाचे रुग्ण
राजधानी दिल्लीमध्ये (National Capitol) आपल्या गाडीतून एकटे प्रवास करत असाल तर आपल्याला मास्क (Wearing Mask) घालणं आवश्यक नाही. मात्र दिल्ली (Delhi)मध्ये आता सार्वजनिक ठिकाणांवर मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. विना मास्क आढळणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून दिल्ली सरकारनं याबाबत आदेश जारी केले आहेत. मात्र खाजगी गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना मात्र हे बंधनकारक नसेल. दिल्लीमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. यामुळं दिल्ली सरकारनं 15 ते 59 वयोगटातील लोकांना बूस्टर डोस फ्री मध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. बूस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरु देखील झाली आहे.
दिल्लीमध्ये पहिल्यांदा विना मास्क फिरणाऱ्यांना 2000 रुपयांचा दंड केला जायचा. मात्र तो कमी करत नंतर 500 रुपये करण्यात आला आहे. मात्र कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर दंड बंद केला होता. मात्र आता पुन्हा दिल्ली सरकारनं पुन्हा मास्क न लावणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड घेण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये गुरुवारी कोरोनाचे 965 रुग्ण सापडलेत तर बुधवारी एक हजारहून जास्त कोरोना रुग्ण समोर आले होते.
कोरोनाचा विळखा वाढू लागल्यानंतर काही राज्यात मास्क वापरणे पुन्हा सक्तीचे करण्यात आले आहे. दिल्ली नोएडा, गाझियाबाद, पंजाब आणि हरियाणामध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. मास्क न वापरणाऱ्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाने जाहीर केले आहे. काही ठिकाणी पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ऑनलाईन वर्ग भरु लागले आहेत. महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसत आहे. राज्यात सध्या मास्क सक्तीचा नाही, राज्यात देखील पुन्हा मास्क बंधनकारक केला जाण्याची शक्यता आहे.