Corona Cases Update : देशातील कोरोना प्रादुर्भावात घट, 24 तासांत 443 रुग्णांचा मृत्यू
Corona Cases Update : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 10,423 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून 443 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Corona Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 10,423 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 443 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण 4,58,880 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना व्हायरसच्या (Corona Cases Update) सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन सक्रिय रुग्णसंख्या 1.53 लाखांवर पोहोचली असून हा आकडा जवळपास 250 दिवसांतील सर्वात कमी सक्रिय रुग्णांचा आकडा आहे. देशासाठी दिलासादायक बाब म्हणजे, कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत सातत्यानं घट होताना दिसून येत आहे. अशातच मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण 3,36,83,581 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
एकिकडे भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली आहे. तर केरळमध्ये मात्र कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद केली जात आहे. आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये 1 नोव्हेंबर रोजी 5,297 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ज्यामध्ये 78 लोकांचा मृत्यू झाला होता. अशातच केरळात बंगाल आणि आसाममध्येही कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे.
मुंबईकरांना मोठा दिलासा; दैनंदिन रुग्णांच्या संख्येत मोठी घट
मुंबईवरील कोरोना संसर्गाचा विळखा दिवसागणिक सैल होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसानंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद झालीय. मुंबई महापालिका क्षेत्रात आज 267 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडलीय. तर, दुसरीकडे 420 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याचबरोबर मागील 24 तासात 4 जणांचा मृत्यू झालाय. आजची आकडेवारी मुंबईतील नागरिकांना दिलासा देणारी ठरतेय.
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आता वेगाने खाली येताना दिसत आहे. मुंबईत आज 267 नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आज 420 रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत एकूण 7 लाख 33 हजार 738 रुग्णांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 97 टक्के इतके आहे. मुंबईत 25 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत कोविड रुग्णवाढीचा दर 0.04 टक्के इतका राहिला असून रुग्णदुपटीचा कालावधी 1 हजार 595 दिवसांवर जाऊन पोहचला आहे.
याशिवाय, राज्यातील रुग्णसंख्येतही घट झालीय. राज्यात आज 809 नवे रुग्ण आढळले असून 10 जणांचा मृत्यू झालाय. याशिवाय, 1 हजार 901 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 66 लाख 11 हजार 887 वर पोहचलीय. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 97. 59 टक्के झालाय. तर, मृत्युदर 2.12 इतका आहे. राज्यात सध्या 1 लाख 60 हजार रुग्ण होम क्वारंटाईन आहेत आणि 993 रुग्ण वैद्यकीय संस्थामध्ये उपचार घेतायेत. महत्वाचे म्हणजे, राज्यात सध्या 15 हजार 552 रुग्ण सक्रीय आहेत.