Corona Cases in India: कोरोना परतीचा मार्गावर! आठवडाभरापासून शेकड्यात रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या सात हजारांपेक्षा कमी
Coronavirus : गेल्या काही दिवसांपासून देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं कमी झाली आहे. सात नोव्हेंबरपासून देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या एक हजारांपेक्षा कमी आहे.
Corona Cases in India: भारतामधील कोरोना अद्याप संपलेला नाही, पण प्रभाव कमी झालेला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं कमी झाली आहे. सात नोव्हेंबरपासून देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या एक हजारांपेक्षा कमी आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या घटत असतानाच कोरोनामुक्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होत आहे.
आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 556 नव्या कोरोना रुग्णाची भर पडली आहे. तर 17 जणांचा मृत्यू झालाय. देशातील एकूण संक्रिय रुग्णांची संख्या सात हजारांच्या खाली आली आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 6782 इतकी झाली आहे. मागील 24 तासांत 252 सक्रिय रुग्ण कमी झाले आहेत. देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर 98.79 टक्के इतका झालाय. देशात आतापर्यंत 4 कोटी 41 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशाचा मृत्यूदर 1.19 टक्के इतका आहे. देशात आतापर्यंत 219.85 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. कोरोना लसीकरणामुळे कोरोनाचा वेग मंदावला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत भारतात कोविड प्रतिबंधात्मक लसीचे 219.84 कोटी डोस देण्यात आले आहेत.
गेल्या वर्षातील देशातील कोरोनाची स्थिती?
ऑगस्ट 2020 च्या सुरुवातीला देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 20 लाख होती, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख तर पाच सप्टेंबर रोजी 40 लाखपेक्षा जास्त झाली होती. 16 सप्टेंबर 2020 रोजी 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 ला 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर 2020 रोजी 90 लाख कोरोना रुग्ण आढळले होते. 19 डिसेंबर 2020 पर्यंत दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या एक कोटींच्या घरात गेली होती. गेल्यावर्षी चार मे 2021 रोजी दोन कोटी तर 23 जून रोजी तीन कोटींच्या पुढे गेली होती. 25 जानेवारी 2022 रोजी देशातील कोरोना रुग्णांची संख्या चार कोटींवर पोहचली होती. पण मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं घसरण झाली आहे. मागील आठवडाभरापासून देशातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत आली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या सात हजारांच्या खाली आली आहे.