Covid-19 In India : 24 तासांत 19 हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 1.36 लाख पार
Corona Cases In India : आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या 19 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
Corona Cases In India : आरोग्य मंत्रालयानं (Health Ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोना (Corona Cases) व्हायरसची लागण झालेल्या 19,893 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अशातच सक्रिय रुग्णांच्या (Active Cases) संख्येत घट झाली असून ही संख्या 1,36,478 वर पोहोचली आहे. 3 ऑगस्ट रोजी देशात 17,135 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजेच, केवळ 24 तासांतच बाधितांचा आकडा वाढून 19 हजारांवर पोहोचला आहे. तसेच, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढून 5,26,530 वर पोहोचली आहे.
राज्यात बुधवारी 1932 रुग्णांची नोंद
राज्यात काल (बुधवारी) 1932 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर काल दिवसभरात एकूण 2187 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबई जिल्ह्यातील आहे. राज्यात काल सात कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,91,665 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98 टक्के इतकं झालं आहे.
मुंबईत बुधवारी 434 रुग्णांची नोंद, 282 कोरोनामुक्त
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत बुधवारी 282 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,03,982 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 652 झाली आहे. सध्या मुंबईत 2,106 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 432 रुग्णांमध्ये 411 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 2831 दिवसांवर गेला आहे.