सोनिया गांधीची पक्षामध्ये सुधारणा आणण्याची इच्छा, पण आजूबाजूचे लोक हे घडू देत नाहीत; विराप्पा मोईलींची G23 नेत्यांवर टीका
काँग्रेसमधील सध्याच्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या G23 गटातील नेत्यांवर विराप्पा मोईली यांनी चांगलीच टीका केली आहे.
नवी दिल्ली: सोनिया गांधी यांची पक्षामध्ये सुधारणा आणण्याची इच्छा आहे, पण आजूबाजूचे लोक असं करु देत नाहीत असा आरोप विराप्पा मोईलींनी G23 गटातील नेत्यांवर केला आहे. आपण सत्तेत नसलो तरी कुणालाही घाबरायचं नाही असंही ते म्हणाले. त्यामुळे पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभवनंतर सक्रिय झालेल्या G23 गटाच्या विरोधात आता विराप्पा मोईलींनी मोर्चा उघडल्याचं दिसून येतंय.
काँग्रेसचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न
काँग्रेसमधील सध्याच्या नेतृत्वाला आव्हान देणाऱ्या G23 गटातील नेत्यांवर विराप्पा मोईली यांनी चांगलीच टीका केली आहे. या गटातील नेते हे काँग्रेसचे खच्चीकरण करत आहेत, पक्षाला दुर्बल करत आहेत असाही आरोप त्यांनी केला.
जी 23 गटाने या चार दिवसांपूर्वी सोनिया गांधींच्या उपस्थितीत एक बैठक घेतली होती. त्यानंतर या गटाने काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझादांच्या दिल्लीतील निवासस्थानी एक बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यामध्ये पाच राज्यांतील पराभवाची कारणं, पक्षामध्ये संघटनात्मक सुधारणा आणि काँग्रेस नेतृत्त्वावर चर्चा करण्यात आली. जी 23 गटाने काँगेसमध्ये संघटनात्मक बदल व्हावा यासाठी आवाज उठवला आहे.
जी 23 गटाकडून सातत्याने बैठका घेण्यात येत असून काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा त्यांचा डाव आहे असा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वाला एक प्रकारचे आव्हान या गटाकडून देण्यात येत असल्याचं सांगण्यात येतंय.
या 23 नेत्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये काँग्रेसला सक्रिय अध्यक्षाची गरज असून त्याची नियुक्ती वेळ न दवडता करावी अशी मागणी केली होती. तसेच पक्षाला सातत्याने येत असलेल्या अपयशावर चर्चा करावी अशीही विनंती त्यांनी केली होती.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha