Congress : काँग्रेसचा 'एक परिवार, एक तिकीट' फॉर्म्युला, पण...
Sonia Gandhi : काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरामध्ये युवकांना अधिक जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक कमिटीमध्ये किमान 50 टक्के युवक असतील असा आग्रह असणार आहे.
![Congress : काँग्रेसचा 'एक परिवार, एक तिकीट' फॉर्म्युला, पण... Congress Udaypur chintan shibir one family one formula to be implemented with youth Congress : काँग्रेसचा 'एक परिवार, एक तिकीट' फॉर्म्युला, पण...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/25/48a9ce1c6bba371e1f3431f1c395cd0e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जयपूर : सातत्याने घराणेशाहीचा आरोप होणाऱ्या काँग्रेसने आता 'एक परिवार एक तिकीट' या फॉर्म्युल्याची घोषणा केली आहे. उदयपूरमध्ये सुरू असलेल्या पक्षाच्या चिंतन शिबिरात हे सूत्र अमंलात आणण्याचं ठरल आहे. काँग्रेसचा हा निर्णय पंक्षांतर्गत विरोधकांना आणि घराणेशाहीची टीका करणाऱ्या भाजपला प्रत्युत्तर असल्याचं सांगितलं जातंय.
एक परिवार एक तिकीट फार्म्युला आणताना काँग्रेस सोबतच एक सोयीस्कर अपवादही आणत आहे. एखाद्या परिवारातला व्यक्ती जर राजकारणात सक्रिय होत असेल आणि त्याला तिकीट हवं असेल तर त्यानं किमान पाच वर्ष संघटनेत काम केलेलं असलं पाहिजे अशी अट असणार आहे. तसेच एक व्यक्तीला एका पदावर केवळ पाच वर्षच राहता येईल अशी सुद्धा व्यवस्था काँग्रेस करणार आहे. याशिवाय संघटनेत दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रत्येक कमिटीत किमान 50 टक्के युवक असलेच पाहिजेत हा आग्रह आहे.
काँग्रेसमध्ये आता युवकांना अधिक प्राधान्य दिलं जाणार असून 35 ते 50 या गटातल्या युवकांवर अधिक जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये 50 वर्षाखालचे सर्व युवा मानले जाणार आहेत.
सोनिया गांधी काय म्हणाल्या?
उदयपूर चिंतन शिबिरात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संबोधन केलं. त्या म्हणाल्या की, "पक्षासमोरचं संकट असाधारण आहे याची मला जाण आहे. असाधारण संकटाचा सामना हा असाधारण पद्धतीनेच करावा लागतो. आपण बदल करणं आवश्यकच आहे. पण विशाल सामूहिक प्रयत्नांनीच पक्ष पुन्हा उभारी घेऊ शकतो."
सोनिया गांधी म्हणाल्या की, देशात भाजपकडून सूडाचं राजकारण केलं जातंय. अल्पसंख्यांकांना लक्ष्य केलं जातंय.
एकीकडे जी-23 गटाने घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे चिंतन शिबिर होत आहे. त्यामध्ये हे महत्वाचे बदल करून पक्ष हा वेगवेगळ्या विचारांना खुला आहे हे संकेत दिले जाणार असल्याची माहिती आहे. हे फक्त बाहेर विरोधकांनाच नाही तर पक्षाच्या आतील काही विसंगत किंवा दबलेले सूर आहेत त्यांच्यासाठीही उत्तर ठरू शकते.
काँग्रेसचे हे चिंतन शिबिर तीन दिवस चालणार आहे. यामध्ये राजकीय, सामाजिक न्याय आणि विकास, अर्थव्यवस्था, संघटन, शेतकरी आणि कृषी, तरुण आणि रोजगार या सहा विषयावर चर्चा यामध्ये चर्चा करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील काँग्रेसचे नेत्यांची कमिटीही तयार करण्यात आलेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)