मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मणिशंकर अय्यरांची काँग्रेसमध्ये वापसी
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसमध्ये पुनरागमन झालं आहे.
नवी दिल्ली : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांचं काँग्रेसमध्ये पुनरागमन झालं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिशंकर यांचं निलंबन रद्द केलं आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान मणिशकंर अय्यर यांनी मोदींना उद्देशून 'नीच प्रवृत्तीचा माणूस' असे शब्द वापरले होते. यामुळे अय्यर यांना पक्षाने निलंबित केलं होतं.
काँग्रेसचे नेते अशोक गहलोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या अनुशासन समितीच्या सल्ल्यानंतर अय्यर यांचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे.
मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर भाजपकडून जोरदार टीका झाली होती. अय्यर यांनी आपल्याला उद्देशून वापरलेले शब्द म्हणजे गुजरातचा अपमान असल्याचं मोदींनी म्हटलं होतं. त्यानंतर काँग्रेसने मणिशंकर अय्यर यांच्यावर कारवाई करत त्यांचं पक्षाचं प्राथमिक सदस्यत्वच निलंबित केलं होतं.
मणिशंकर अय्यर काय म्हणाले होते? “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी एका व्यक्तीचं मोठं योगदान होतं, त्यांचं नाव म्हणजे जवाहरलाल नेहरु आणि अशा कुटुंबाबद्दल घाणेरडे वक्तव्य केली जातात, तेही डॉ. आंबेडकरांच्या नावाने मोठ्या वास्तूच्या उद्घटनावेळीच. मला वाटतं ही (नरेंद्र मोदी) व्यक्ती अत्यंत नीच प्रकारची आहे. तिच्यात कोणतीही सभ्यता नाही. अशा चांगल्या प्रसंगी घाणेरड्या राजकारणाची काय गरज आहे?”, असे मणिशंकर अय्यर म्हणाले होते.
मणिशंकर अय्यर यांच्या विधानावर राहुल गांधींनीही टीका केली होती. अय्यर यांनी तातडीने माफी मागावी अशी अपेक्षा राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांचं निलंबन केलं होतं.