एक्स्प्लोर
कोण होणार काँग्रेस अध्यक्ष : युवा नेत्याला अध्यक्षपद देण्याच्या मागणीला जोर, ज्येष्ठांच्या नावांना विरोध
अध्यक्षपदासाठी सध्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत. मात्र शिंदे यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ चेहऱ्यांना काँग्रेसमधून विरोध होऊ लागला आहे.
नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पुढचा अध्यक्ष कोण? यावरून खलबते रंगली आहेत. ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारून तरुण नेत्याला पक्षाचे नेतृत्व द्यावे अशी मागणी काँग्रेसच्या एका गटातून पुढे येऊ लागली आहे.
अध्यक्षपदासाठी सध्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह काही ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत. मात्र शिंदे यांच्यासह मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारख्या ज्येष्ठ चेहऱ्यांना काँग्रेसमधून विरोध होऊ लागला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री सिंह यांनी युवा नेत्याला नवा अध्यक्ष बनवा, अशी मागणी केली आहे. ज्येष्ठांनी युवा नेत्यांसाठी मार्ग खुला करावा असेही त्यांनी म्हटले आहे. देशव्यापी ओळख आणि जमिनीशी नाळ जुळलेल्या युवा नेत्याला ही जबाबदारी द्यावी, असे सिंह यांनी म्हटले आहे.
लवकरच काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक
पहिल्यांदाच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने खुलेआम युवा नेत्याकडे पक्षाची कामं सोपविण्याबाबत भाष्य केले आहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक लवकरच होणार आहे. ही कमिटी पुन्हा एकदा राहुल यांना राजीनामा मागे घेण्याची मागणी करणार आहेत. सध्या तरी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अशोक गहलोत यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची नावे काँग्रेस अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
'ग्रँड ओल्ड पार्टी'ला युवा नेतृत्व हवं
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे की, एक युवा नेतृत्वच ग्रँड ओल्ड पक्षामध्ये जीव फुंकू शकतो. सिंह यांनी राहुल गांधी यांचा राजीनामा दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. सिंह यांनी म्हटले आहे की, पक्षाला आता एका युवा नेतृत्वाच्या ऐवजी दुसऱ्या युवा नेतृत्वाची गरज आहे. राहुल गांधी यांनी पक्षामध्ये युवा नेतृत्वाला एक उत्तम दिशा दिली आहे. युवकांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात एक युवा नेताच लोकांच्या इच्छा आणि आकांशा समजून घेऊ शकतो, असे सिंह यांनी म्हटले आहे. पक्षामध्ये होणारे परिवर्तन भारताच्या 65 टक्के लोकसंख्येचा विचार करून व्हायला हवे, असेही त्यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ नेत्यांना कॅप्टन सिहांचा सल्ला
कॅप्टन सिंह यांनी म्हटले की, अनुभवी ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात नव्या विचारधारेच्या युवा नेतृत्वाकडे पक्षाची कमान सोपविल्यास नवभारताचा मार्ग सुकर होऊ शकतो. ज्येष्ठांनी नव्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, अन्यथा काँग्रेस सध्याच्या परिस्थितीचा सामना करू शकणार नाहीत, असे सिंह यांनी म्हटले आहे.
काँग्रेसकडे कोण आहेत नवीन युवा चेहरे
कॅप्टन यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेस पक्षात नवीन युवा नेतृत्व कोण? यावर चर्चा देखील सुरु झाली आहे. यामध्ये मुख्यत्वे सचिन पायलटआणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. पायलट सध्या राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तर शिंदे पक्षाचे महासचिव असून त्यांच्याकडे पश्चिम उत्तरप्रदेशची जबाबदारी आहे. मुकुल वासनिक यांचेही नाव या यादीत आहे. ते सध्या पक्षाचे महासचिव आहेत. प्रियांका गांधी यांच्या नावावर सध्या तरी चर्चा केली जात नाही. राहुल गांधींच्यानंतर पक्षाचा अध्यक्ष हा गांधी परिवाराच्या बाहेरील अध्यक्ष असावा, अशी खुद्द गांधी परिवाराची इच्छा आहे. नव्या अध्यक्षांच्या निवडीत माझी कुठलीही भूमिका नसेल, असे राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
काँग्रेस अध्यक्षपदाची माळ सुशीलकुमार शिंदेंच्या गळ्यात पडण्याची शक्यता
राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस अध्यक्षपदाची माळ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता सर्वाधिक आहे. शिंदे हे गांधी परिवाराच्या मर्जीतले सहकारी मानले जातात. सध्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत शिंदे यांचेच नाव आघाडीवर आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला पहिल्यांदाच सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपाने काँग्रेस अध्यक्षपदाचा मान मिळण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या कार्यकारी कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी पदावर कायम राहावं यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले मात्र तरीही राहुल आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
तर शिंदे होतील चौथे महाराष्ट्रीय
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला पहिल्यांदाच सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपाने काँग्रेस अध्यक्षपदाचा मान मिळण्याची शक्यता आहे. स्वातंत्रपूर्व काळात 1900 मध्ये नारायण गणेश चंदावरकर यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली होती. तर गोपालकृष्ण गोखले हे 1905 साली तर रघुनाथ मुधोळकर हे 1912 साली काँग्रेस अध्यक्ष झाले होते. त्यानंतर महाराष्ट्राला सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपाने चौथा अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण? सस्पेन्स संपेना, राहुल गांधींसाठी निष्ठावानांकडून प्रयत्न सुरुच
कुठल्याही स्थितीत राजीनामा मागे घेणार नाही, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं स्पष्टीकरण
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसोबत राहुल गांधींची बैठक, नाना पटोले यांचा राजीनामा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement