Bharat India Row : शशी थरूर यांनी विरोधकांच्या आघाडीसाठी 'BHARAT' आद्याक्षरे वापरून सुचवलं नवीन नाव
Shashi Tharoor On India Bharat : इंंडिया की भारत अशी चर्चा सुरू असताना काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी विरोधकांच्या आघाडीसाठी BHARAT हे नाव सुचवताना त्याचा अर्थ सांगितला आहे.
नवी दिल्ली: भारतीय राज्यघटनेत इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे असताना सध्या भारत (Bharat) की इंडिया (India) या नावावरून चर्चा रंगली आहे. विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया (I.N.D.I.A) आघाडीला शह देण्यासाठी भाजपच्या नेतृत्त्वातील सरकारने भारत हे नाव पुढे केला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी आता भारत (BHARAT) हे आद्याक्षर वापरून विरोधकांच्या आघाडीचे नाव सुचवले आहे.
शशी थरूर यांनी 'एक्स'वर (आधीचे ट्वीटरवर) पोस्ट करताना म्हटले की, आम्ही आमच्या आघाडीला अलायन्स फॉर बेटरमेंट, हार्मोनी अँड रिस्पॉन्सिबल अॅडव्हान्समेंट फॉर टुमारो (Betterment, Harmony And Responsible Advancement for Tomorrow (BHARAT) ) असे म्हणू शकतो. मग कदाचित सत्ताधारी पक्ष नावे बदलण्याचा हा खेळ थांबवतील असे थरूर यांनी म्हटले.
याआधीदेखील भारत की इंडिया या वादावर थरुर यांनी आपले मत व्यक्त केले होते. थरुर यांनी म्हटले की, इंडिया या नावाचे एक मूल्य आहे. सरकार हे नाव वगळण्याचा मुर्खपणाचा निर्णय घेऊ शकत नाही, अशी अपेक्षा आहे. भारत या नावाला आपला आक्षेप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मल्ल्याळम आणि हिंदी भाषिक दैनिकांमध्ये भारत याच शब्दाचा वापर होतो. इंडिया आणि भारत ही दोन्ही यापुढेही कायम ठेवावीत अशी अपेक्षाही खासदार थरूर यांनी व्यक्त केली.
We could of course call ourselves the Alliance for Betterment, Harmony And Responsible Advancement for Tomorrow (BHARAT).
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) September 6, 2023
Then perhaps the ruling party might stop this fatuous game of changing names.
राष्ट्रपतींच्या आमंत्रण पत्रिकेवरून चर्चांना उधाण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर 9 सप्टेंबर रोजी रात्र भोजनाचे आयोजन केले आहे. या आमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला. त्यानंतर हा देशाच्या नामांतराचा घाट आहे का अशी पहिली शंका काँग्रेसने घेतली. त्यानंतर इतर राजकीय पक्षांनी, विचारवंतांनी, खेळाडूंपासून कलाकार, सामान्य नागरीक अशा विविध घटकांनी देखील याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.
भारतीय राज्यघटनेत India that is Bharat..shall be union of states. असं नमूद करण्यात आले आहे. याचाच अर्थ इंडिया आणि भारत अशी दोन्ही नावे अधिकृत आहेत. तर, इंडियाऐवजी भारत असा उल्लेख व्हावा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जुनी मागणी आहे. काही दिवसांपूर्वी सरसंघचालकांनी या भूमिकेचा पुनरुच्चार केला होता.