(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Co-WIN portal: CoWiN पोर्टलवरील डेटा टेलिग्रामवर लीक झाला? विरोधकांचा हल्लाबोल, सरकार म्हणतंय की...
Co-WIN Portal Data Leak: कोविन पोर्टलवर भारतातील राजकीय नेते, पत्रकार, तज्ज्ञ, शास्त्रज्ञांसह कोट्यवधी नागरिकांची आधार, पासपोर्ट, पॅनकार्ड क्रमांक आदी महत्त्वाची माहिती आहे. हीच माहिती लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
Co-WIN Portal: भारतीयांच्या कोविड लसीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या CoWin पोर्टल, अॅपवर नोंदणी केलेल्या नागरिकांचा डेटा टेलिग्रामवर (Telegram) लीक (Data Leak) झाला असल्याचे वृत्त समोर आल्याने एकच खळबळ उडाली. विरोधी पक्षांनी या मुद्यावर सरकारवर जोरदार हल्लाबोलही केला. मात्र, सरकारने हे वृत्त फेटाळून लावले आहे. कोविन पोर्टलवर भारतातील राजकीय नेते, पत्रकार, तज्ज्ञ, शास्त्रज्ञांसह कोट्यवधी नागरिकांची आधार, पासपोर्ट, पॅनकार्ड क्रमांक आदी महत्त्वाची माहिती आहे. हीच माहिती लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
मल्याळी वृत्तसमूह मल्याळम मनोरमाने या बाबतचे वृत्त दिले, डेटा लीकचे वृत्त समोर येताच, विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी मोदी सरकारवर कोविड-19 लसीकरण अॅप CoWin च्या मदतीने नागरिकांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर, सरकारने हे सगळे आरोप फेटाळून लावले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय एक विस्तृत अहवाल जारी करणार असून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सरकारने काय म्हटले?
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा डेटा जुना आहे. आम्हीदेखील याची पुष्टी करण्याचा प्रयत्न करत आहोत. या संबंधी मंत्रालयाने एक अहवाल मागितला आहे. सरकारने म्हटले की, आरोग्य मंत्रालयाचा को-विन पोर्टल डेटा गोपीयनतेसह सुरक्षित आहे. डेटा लीक झाल्याचे वृत्त खोडसाळ असून त्याला कोणताही आधार नाही. आरोग्य मंत्रालयाने सीईआरटी-इनला (Computer Emergency Response Team CERT-In) याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
मंत्री राजीव चंद्रशेखर काय म्हणाले?
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्वीट करून डेटा लीक प्रकरणावर भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, एक टेलिग्राम अकाउंट फोन क्रमांक नमूद केल्यावर कोविन अॅपची माहिती देत होता. या टेलिग्राम बॉटकडे जो डेटा होता तो आधीच लीक झालेला जुना डेटा असल्याचे समजते. कोविन अॅप डेटाबेसचे उल्लंघन झाले असावे असे वाटत नसल्याचे त्यांनी म्हटले.
CoWIN पोर्टलवर वेब अॅप्लिकेशन फायरवॉल, नियमित भेद्यता मूल्यांकन आणि ओळख आणि प्रवेश व्यवस्थापनासह सुरक्षा उपाय आहेत. केवळ OTP आधारेच डेटाचा दिला जातो. CoWIN पोर्टलमधील डेटाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व पावले उचलली गेली आहेत आणि घेतली जात आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
प्रौढ लसीकरणासाठी फक्त जन्माचे वर्ष घेतले जाते परंतु माध्यमाच्या वृत्तातील दाव्यानुसार, बॉटने जन्मतारीख देखील नमूद केली आहे. तसेच, लाभार्थीचा पत्ता कॅप्चर करण्याची कोणतीही तरतूद नाही, असेही CERT-In च्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
काय आहेत आरोप?
वृत्तानुसार, मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामवर भारतीय नागरिकांची वैयक्तिक माहिती, आधार कार्ड आणि पासपोर्ट तपशील लीक झाला आहे. मल्याळम मनोरमाच्या वृत्तानुसार, हा डेटा लीक कोविड लसीकरण पोर्टल कोविनवरून झाला आहे, ज्यामध्ये लोकांनी त्यांचे वैयक्तिक तपशील नमूद केले होते. त्याच वेळी, सरकारी सूत्रांनी सांगितले की पोर्टल केवळ त्या व्यक्तीची लसीकरण केल्याची तारीख ठेवते. कोविन पोर्टल जन्मतारीख आणि घराचा पत्ता याची नोंद करत नाही. Cowin पोर्टल केवळ युजर्सबद्दल त्यांनी पहिला डोस, दुसरा डोस किंवा precausion डोस घेतला आहे की नाही, याची नोंद ठेवते.