बुलंदशहर साधूंच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता, उत्तरप्रदेश मुख्यमंत्र्यांशीही फोनवर बातचीत
उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये सोमवारी रात्री दोन साधूंची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. हे दोनही साधू त्याच मंदिरात वास्तव्य करत होते.हत्येप्रकरणी प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी राजू नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.
नवी दिल्ली : पालघरमधल्या मॉब लिचिंगमध्ये दोन साधूंची हत्या, त्यानंतर महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याचं राजकारण झालं होतं. त्यानंतर अवघ्या काही दिवसात उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरात साधूंची हत्या झाल्यानं या प्रकरणावरुन टोलेबाजी सुरु झाली आहे. बुलंदशहरमध्ये झालेल्या दोन साधूंच्या हत्येबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन चिंता व्यक्त केली.
"अशा अमानुष घटनेच्या विरोधात आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत. ज्याप्रकारे आम्ही अशा प्रकारच्या घटनेत कठोर कायदेशीर कारवाई केली आहे, त्याचप्रकारे तुम्हीसुद्धा कराल आणि दोषींना कडक शिक्षा कराल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शिवाय या घटनांना धार्मिक रंग देऊ नये", असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवरुन केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री @myogiadityanath जी यांच्याशी फोनवर चर्चा करून उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे घडलेल्या दोन साधूंच्या अमानुष हत्येवरून चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटने विरुद्ध आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) April 28, 2020
उत्तर प्रदेशातल्या बुलंद शहरमध्ये सोमवारी रात्री दोन साधूंची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. हे दोनही साधू त्याच मंदिरात वास्तव्य करत होते. 52 आणि 35 वर्षांचे हे दोन साधू होते. त्यांच्या हत्येप्रकरणी प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी राजू नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान बुलंदशहरमध्ये साधूंची हत्या झाल्यानंतर आज सकाळपासूनच शिवसेनेच्या नेत्यांनी पालघर प्रकरणात धार्मिक राजकारण झालं तसं यावेळी होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करत टोलेबाजी केली. देश कोरोनाशी लढत आहे, शांतता राखा, या विषयाचं कुणी पालघरप्रमाणे राजकारण करु नये, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन लगावला.
पालघरची घटना घडल्यानंतर या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केली होती. पालघर प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाल्यानंतर या प्रकरणात अटक करण्यात आलेले 101 लोकांपैकी एकही मुस्लीम नसल्याचं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. याच प्रकरणाला धार्मिक रंग दिल्याच्या आरोपावरुन रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातही काँग्रेस कार्यकर्त्यांनी एफआयआर दाखल केल्या होत्या.भयानक! बुलंदशहर, यूपी के एक मंदिर में दो साधुओं की हत्या, लेकिन मैं सभी से अपील करता हूं कि वे इसे सांप्रदायिक न बनाएं, जिस तरह से कुछ लोगों ने पालघर मामले में करने की कोशिश की।
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 28, 2020