Clevira drug on coronavirus : कोरोनावर सहाय्यक उपचार म्हणून 'क्लेविरा'ला भारत सरकारकडून नियामक मंजुरी
क्लेविराला सौम्य ते मध्यम कोविड-19 वरील सहाय्यक उपचार म्हणून भारत सरकारकडून नियामक मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
मुंबई : चेन्नई स्थित ऍपेक्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड फार्मास्युटिकल्स कंपनीने सौम्य ते मध्यम कोविड-19वरील सहाय्यक उपचार म्हणून क्लेविरा हे अँटिव्हायरल हर्बल फॉर्म्युलेशन सादर केले आहे. या फॉर्म्युलेशनच्या वापरामुळे रुग्ण बरा होण्याचा दर उपचारांच्या पाचव्या दिवशी 86 टक्के तर दहाव्या दिवशी 100 टक्के असल्याचे आढळून आले आहे. किडनी व यकृताचे आजार असलेल्या लोकांसाठी हे सुरक्षित असून रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती आणि फ्रंटलाईन कर्मचारी याचा वापर रोगप्रतिबंधक उपचार म्हणून करू शकतात. क्लेविराला सौम्य ते मध्यम कोविड-19 वरील सहाय्यक उपचार म्हणून भारत सरकारकडून नियामक मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
मुळात क्लेविरा हे 2017 साली डेंग्यू रुग्णांवरील उपचारांसाठी विकसित करण्यात आले होते. गेल्या वर्षी देशात कोविड-19 केसेसची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सौम्य ते मध्यम कोविड लक्षणे असल्यास सहाय्यक उपचार म्हणून या औषधाची पुनर्निर्मिती करण्यात आली. संपूर्ण देशभरात हे औषध उपलब्ध असून एका गोळीची किंमत 11 रुपये आहे.
मे-जून 2020 मध्ये 100 व्यक्तींवर क्लिनिकल चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये हाती आलेले निष्कर्ष आशादायक होते. तामिळनाडू सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, ओमानदुरार गव्हर्नमेंट इस्टेट चेन्नई येथे करण्यात आलेल्या 30 दिवसांच्या चाचणीमध्ये निवडण्यात आलेल्या 100 व्यक्तींना प्रत्येकी 50 रुग्ण अशा 2 गटांमध्ये विभागण्यात आले होते.
नियंत्रण गटामधील, सार्स-कोव-2 संसर्ग झालेल्या रुग्णांवर रुग्णालयाच्या नियमांनुसार आणि जागतिक आरोग्य संघटना/आयसीएमआर मार्गदर्शक सूचनांचे पालन करत मानक उपचार करण्यात आले. परीक्षण गटातील, सार्स-कोव-२ संसर्ग झालेल्या रुग्णांना रुग्णालयाच्या नियमांनुसार आणि जागतिक आरोग्य संघटना/आयसीएमआर मार्गदर्शक सूचनांचे पालन करत मानक उपचारांच्या बरोबरीनेच दिवसातून दोनदा तोंडावाटे क्लेविरा टॅब्लेट्स 14 दिवस देण्यात आल्या. या चाचणीमध्ये असे आढळून आले की, नैदानिक उपचारांद्वारे रुग्ण बरे होण्याचा कालावधी क्लेविरामुळे लक्षणीय प्रमाणात कमी झाला. रुग्णांची अंगदुखी कमी होणे, श्वसनाचा वेग सामान्य होणे (दर मिनिटाला २४ पेक्षा कमी), ऑक्सिजन सॅच्युरेशन स्तरामध्ये सुधारणा (९४% पेक्षा जास्त) इत्यादी निरीक्षणे यामध्ये नोंदवली गेली, असं कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
क्लेविरा ज्यांना देण्यात आले त्यांच्यापैकी 86% रुग्णांची कोविड19 आरटी-पीसीआर तपासणी पाचव्या दिवशी निगेटिव्ह आली आणि दहाव्या दिवशी आरटी-पीसीआर तपासणी केली असता 100 टक्के रुग्ण नेगेटिव्ह असल्याचे आढळून आले. कोविडच्या लक्षणांमध्ये 4.1दिवसात नैदानिक सुधारणा आढळून आली.
कंपनीच्या संचालिका सुभाषिनी वनंगमुडी यांनी सांगितले, "सीएबीबरोबरीनेच सहाय्यक उपचारांमुळे सौम्य ते मध्यम कोविड १९ रुग्णांना रुग्णालयात भरती व्हावे लागण्याची गरज लक्षणीय प्रमाणात कमी होण्यात मदत होईल. आयसीयूमध्ये एक जरी रुग्ण कमी असला तरी सध्याच्या आणीबाणीच्या काळात खूप मोठा फरक पडू शकतो, स्रोतसाधने गरजूंसाठी वापरली जाऊ शकतात व ज्यांना सर्वात जास्त आवश्यकता आहे त्यांच्याकडे नीट लक्ष पुरवले जाऊ शकेल.
कंपनीचे सी आर्थर पॉल यांनी सांगितले, "ताप, अंगदुखी, डोकेदुखी इत्यादी लक्षणांमध्ये ४ दिवसात लक्षणीय सुधारणा आढळून येते तर १० दिवसात रुग्ण १००% बरे होतात. क्लेविरामधील ५२ फिटोकॉन्स्टिट्युएंट्स शरीरावरील विषाणू संसर्गाचे ओझे लक्षणीय प्रमाणात कमी करतात आणि आजाराच्या वाढीवर नियंत्रण ठेवतात. कोविड१९ पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि फ्रंटलाईन आरोग्यसेवा कर्मचारी देखील याचा वापर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून करू शकतात." क्लेविरा हे ऍपेक्सच्या संशोधन विकास केंद्राने सिद्ध झालेल्या शास्त्रोक्त पुराव्यांच्या आधारे विकसित केले आहे."
क्लिनिकल तपासणीचे निष्कर्ष तामिळनाडू सरकार, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि आयुष मंत्रालय यांना २०२० मध्ये सादर करण्यात आले होते. सखोल तपासणी आणि विचारविनिमयानंतर भारत सरकारने (आयुष मंत्रालय) सौम्य ते मध्यम कोविड१९ लक्षणांवरील उपचारांसाठी सहाय्यक उपाय म्हणून वापरण्यासाठी या औषधाला मान्यता दिली आहे. भारतात देण्यात आलेली ही अशाप्रकारची पहिली मंजुरी आहे. यामध्ये सेंट्रल कौन्सिल फॉर इन आयुर्वेदिक सायन्सेस आणि आयुष मंत्रालयाने स्थापन केलेल्या, १२ सदस्यांचा समावेश असलेल्या इंटर-डिसिप्लिनरी टेक्निकल रिव्ह्यू कमिटीने विविध स्तरांवर तपासणी केली आहे. एआयआयएमएसच्या फार्माकोलॉजी विभागाचे माजी प्रोफेसर डॉ. एस के मौलिक हे या कमिटीचे प्रमुख आहेत, असं कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.