New CJI : नवे सरन्यायधीश म्हणून न्या. चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस; CJI लळीत यांनी पाठवले केंद्राला पत्र
New CJI : विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे.
New CJI : देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्या. चंद्रचूड (Justice Chandrachud) यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत (CJI Uday Lalit) यांनी ही शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. विद्यमान सरन्यायाधीश (Chief Justice Of India) हे निवृत्तीच्या काही दिवस आधी आपल्यानंतरच्या सरन्यायाधीशाच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला करतात. त्यानुसार ही प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. सरन्यायाधीश उदय लळीत हे पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत.
केंद्र सरकारने विद्यमान सरन्यायाधीश उदय लळीत यांना पुढील सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस करण्याबाबत पत्र पाठवले होते. सेवा ज्येष्ठतेनुसार, न्या. चंद्रचूड हे ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. त्यामुळे प्रचलित नियम आणि प्रक्रियेनुसार, न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. न्या. चंद्रचूड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यास ते देशाचे 50 वे सरन्यायाधीश होतील. नवीन सरन्यायाधीशांचां शपथविधी 9 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. न्या. चंद्रचूड सरन्यायाधीश झाल्यास त्यांचा कार्यकाळ हा 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
Chief Justice of India UU Lalit recommends the name of Justice DY Chandrachud (in file pic) as his successor.
— ANI (@ANI) October 11, 2022
Justice Chandrachud to become the 50th CJI. Chief Justice UU Lalit is retiring on November 8 this year. pic.twitter.com/p0OymLfp0n
CJI लळित 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार
CJI लळित यांचा कार्यकाळ 8 नोव्हेंबर 2022 रोजी संपुष्टात येणार आहे. सरन्याधीश म्हणून त्यांना 74 दिवसांचा कार्यकाळ मिळाला. न्या. लळीत यांनी 26 ऑगस्ट 2022 रोजी देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारली होती. त्यााधीचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांचा कार्यकाळ जवळपास दीड वर्षांचा होता.
वडिलांनंतर आता मुलगाही होणार सरन्यायाधीश
न्या. चंद्रचूड यांचे वडील यशवंत चंद्रचूड हे देखील भारताचे 16 वे सरन्यायाधीश होते. त्यांनी 22 जानेवारी 1978 ते 11 जुलै 1985 या कालवधीत सरन्यायाधीशपदाची जबाबदारी पार पाडली. वडिलांच्या निवृत्तीनंतर आता 37 वर्षांनी न्या. धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश होणार आहेत.