Chhattisgarh Election 2023 : छत्तीसगड होता काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला, मग कुठे चूक झाली? ही पाच कारणं आहेत जबाबदार?
Chhattisgarh Election 2023 : छत्तीगडमध्ये काँग्रेसला त्यांची सत्ता राखताना दमछाक झाली असून भाजपची सरशी होत असल्याचं चित्र आहे.
मुंबई : छत्तीगडमध्ये (Chhattisgarh) काँग्रेसचं (Congress) सरकार डळमळलं असून भाजप (BJP) बहुमताच्या दिशेने यशस्वी वाटचाल करत असल्याचं चित्र आहे. आज छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या (Chhattisgarh Assembly Election) मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये सत्ताधारी पक्ष काँग्रेस आघाडीवर होता. सुरुवातीला पोस्टल मतपत्रिकांची मोजणी करण्यात आली. पण, त्यानंतरच्या कलामध्ये काँग्रेसला धक्का बसू लागला. परंतु अनेकांचा कौल हा काँग्रेस पुन्हा सत्ता स्थापन करणार याकडे होता.
छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं. यावेळी 1 कोटी 55 लाखांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस पुढे होती, पण हळूहळू परिस्थिती बदलत गेली. तज्ज्ञांनुसार, भूपेश बघेल यांच्या सरकारच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी होती. भूपेश बघेल यांच्या योजना चांगल्या होत्या पण त्यांची अंमलबजावणी नीट करता आली नसल्याचं मत यावेळी व्यकत करण्यात आलं. त्यातच महादेव अॅपच्या प्रकरणामुळे निवडणुकीच्या तोंडवर काँग्रेसला मोठा धक्का बसला. तसेच टीएस सिंह देव यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यास देखील विलंब झाला असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं. दरम्यान काँग्रेसची पिछेहाट नेमकी कोणत्या कारणांमुळे झाली त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
ही आहेत पाच कारणं?
छत्तीगडमध्ये निवडणुकीचे वातावरण असतानाच महादेव बेटींग अॅपचे प्रकरण समोर आले. त्यामुळे या राज्यातील राजकीय वातावरणात बरीच उलथापलथ झाली. खरतर मागील अनेक महिन्यांपासून महादेव बेंटींग अॅपबाबत सातत्याने चर्चा होत होती. या प्रकरणात सुरुवातील बॉलीवूडच्या कलाकारांची नावं पुढं आलीत. त्यानंतर याप्रकरणात छत्तीगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचं देखील नावं पुढं आलं. त्यानंतर भाजपने मुख्यमंत्री भुपेश बघेल यांच्यासह काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महादेव बेटींग अॅपमुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचं म्हटलं जातं आहे.
दरम्यान छत्तीगडमध्ये ईडीच्या कारवाया देखील सातत्याने होत होत्या. ईडीने अनेक प्रकरणांशी संबंधित राज्यात अनेक ठिकाणी छापेमारी केली. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपकडून होत होता आणि जनतेसमोर भ्रष्टाचाराचे मोठे खुलासे देखील होत होते. त्यामुळे राज्यात भुपेश बघेल यांच्या सरकारची प्रतिमा दिवसागणिक खराब होत गेल्याचं चित्र होतं. यामुळे देखील काँग्रेसची पिछेहाट झाल्याचं म्हटलं जात आहे.
त्याचप्रमाणे छत्तीगडमध्ये काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह देखील मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे पुन्हा एकदा या गोष्टीचा देखील फटका काँग्रेसला बसला असल्याचं म्हटलं जातंय.
छत्तीगडमधील कथित दारु घोटाळ्यातील आरोपांमुळे देखील पुन्हा एकदा भुपेश बघेल यांच्या सरकारची प्रतिमा मलिन होत गेली. याचा देखील फटका काँग्रेसला या निवडणुकांमध्ये बसला असण्याची शक्यता आहे.
असं देखील म्हटलं जात आहे की, सुरुवातीपासून भुपेश बघेल यांच्याकडे बराच आत्मविश्वास होता. त्यांचा हाच आत्मविश्वास छत्तीगडमध्ये काँग्रेसला महागात पडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.