(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chandrayaan 3 : भारताचे चांद्रयान मिशन अमेरिका, रशिया आणि चीनपेक्षा वेगळे आणि ऐतिहासिक कसं? चंद्राचा दक्षिण ध्रुव महत्त्वाचा का?
Chandrayaan 3 Landing Update: चंद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल आज संध्याकाळी 6.04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. या ऐतिहासिक मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Chandrayaan 3 Moon Landing: भारताचे चांद्रयान-3 अवकाशात इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल आज संध्याकाळी 6.04 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. चीन, अमेरिका आणि रशियाने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केले आहे, परंतु यापैकी कोणताही देशाची चंद्रमोहीम दक्षिण ध्रुवावर उतरली नाही. चंद्राचा दक्षिण ध्रुव विशेष का आहे आणि भारताची ही मोहीम वेगळी आणि ऐतिहासिक का आहे हे पाहुयात.
भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. हा चंद्राचा तो भाग आहे जिथे आजपर्यंत कोणीही पोहोचू शकलेले नाही. याआधीही भारतासह अनेक देशांनी या भागापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र यश मिळाले नाही. 2019 मध्ये भारताचे चांद्रयान-2 दक्षिण ध्रुवावर उतरण्यापूर्वी काही अंतरावर क्रॅश झाले. त्यानंतर मिशन चांद्रयान-3 ची घोषणा करण्यात आली.
चांद्रयान-3 मोहीम विशेष का आहे?
भारताच्या चांद्रयान-3 सोबतच रशियानेही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपली लूना-25 मोहीम पाठवली. परंतु चंद्रावर उतरण्यापूर्वीच लुना-25 क्रॅश झाले. अशा स्थितीत संपूर्ण जगाच्या नजरा आता भारताच्या चांद्रयान-3 कडे लागल्या आहेत. चांद्रयान-3 च्या लँडिंगची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
डॉ. व्ही.टी. वेंकटेश्वरन हे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागांतर्गत स्वायत्त संस्थेतील विज्ञान प्रसाराचे शास्त्रज्ञ आणि भारतीय ज्योतिष परिषदेच्या जनसंवाद समितीचे सदस्य आहेत. त्यांनी चंद्रावरील दक्षिण ध्रुव का महत्त्वाचा आहे याची माहिती दिली.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचे काय?
डॉ. व्हीटी वेंकटेश्वरन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, चंद्राचा दक्षिण ध्रुव त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि संभाव्य वैज्ञानिक मूल्यामुळे वैज्ञानिक संशोधनाच्या केंद्रस्थानी आहे. असे मानले जाते की दक्षिण ध्रुवावर पाणी आणि बर्फाचे मोठे साठे आहेत. चंद्राचा हा भाग अंधारात राहतो. येथे असलेले पाणी महत्त्वाचे आहे कारण त्याचे पिण्यासाठी, ऑक्सिजन आणि हायड्रोजन तसेच रॉकेट इंधन यांसारख्या स्त्रोतांमध्ये रूपांतर केले जाऊ शकते.
डॉ. व्हीटी वेंकटेश्वरन यांनी सांगितले की चंद्राचा हा भाग सूर्यप्रकाशापासून कायमचा दूर असतो आणि इथले तापमान -230 डिग्री पर्यंत असते. दक्षिण ध्रुवाचा पोत चंद्राच्या इतर भागांपेक्षा वेगळा आहे. चंद्राच्या या खडबडीत भागात असलेले पाणी बर्फाच्या रूपात गोठलेले आढळू शकते.
सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरणार
सॉफ्ट लँडिंगच्या दृष्टीने भारताचे हे मिशन आणखी खास आहे. वास्तविक आतापर्यंत केवळ अमेरिका, रशिया आणि चीन चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करू शकले आहेत. चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगमुळे भारत हा पराक्रमही करेल. भारताने 14 जुलै रोजी चांद्रयान-3 मोहीम प्रक्षेपित केली. त्याचे विक्रम लँडर आज संध्याकाळी 6.04वाजता रोव्हर प्रज्ञानसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे.
ही बातमी वाचा: