Chandrayaan 3 : चांद्रयान 3: 'प्रज्ञान रोव्हरचे चंद्रावर शतक; इस्रोनी दिली नवी अपडेट
Chandrayaan 3 News : भारताच्या चांद्रायान मोहिमेने आणखी एक टप्पा गाठला आहे. प्रज्ञान रोव्हरने 100 मीटरचे अंतर कापले आहे.
नवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan 3) मोहिमेवर लागले आहे. भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरचे यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. त्यानंतर या लँडरमधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडला असून सध्या चंद्रावर फिरून विविध माहिती गोळा करत आहे. चंद्रावर प्रज्ञान रोव्हरने शतक पूर्ण केले आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर आतापर्यंत 100 मीटरचे अंतर कापले आहे. इस्रोने शनिवारी ही माहिती दिली.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर पोस्ट करत माहिती दिली आहे. चांद्रयान-3 मोहिमेची प्रज्ञानचे शतक पूर्ण झाले आहे. त्याने आतापर्यंत चंद्रावर 100 मीटरपेक्षा जास्त प्रवास केला आहे. प्रज्ञानचा प्रवास अजूनही सुरू असल्याची माहिती इस्रोने आपल्या ट्वीटमध्ये दिली.
23 ऑगस्ट रोजी सॉफ्ट लँडिंग
चांद्रयान-3 मिशनच्या लँडर मॉड्यूलने 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.4 वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. लँडिंगनंतर काही तासांनी प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर आला आणि चंद्राच्या पृष्ठभागावर फिरू लागला.
Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) September 2, 2023
🏏Pragyan 100*
Meanwhile, over the Moon, Pragan Rover has traversed over 100 meters and continuing. pic.twitter.com/J1jR3rP6CZ
चांद्रयान-३ मोहिमेत पुढे काय होणार?
मोहिमेच्या पुढील प्रक्रियेबद्दल माहिती देताना इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी शनिवारी सांगितले की, चंद्रावर पाठवलेले चांद्रयान-3 चे रोव्हर आणि लँडर व्यवस्थित काम करत आहेत आणि चंद्रावर रात्र होणार असल्याने त्याचे काम थांबवण्यात येणार आहे.
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, सोमनाथ म्हणाले की, आमची टीम आता वैज्ञानिक उपकरणांसह बरेच काम करत आहे. त्यांनी पुढे सांगितले की रोव्हर लँडरपासून किमान 100 मीटर दूर आहे आणि आम्ही येत्या एक-दोन दिवसांत त्यांना निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहोत.
आदित्य एल1 मिशनचे यशस्वी प्रक्षेपण
शनिवारीच, इस्रोने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून आपली पहिली सूर्य मोहीम 'आदित्य एल1' यशस्वीरित्या प्रक्षेपित केली. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर दूर असलेल्या लॅग्रॅन्गियन-1 बिंदूवर पोहोचण्यासाठी 125 दिवस लागतील.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ॲल्युमिनियमसह ऑक्सिजनही आढळले
भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेला मोठं यश मिळाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थने (ISRO) मंगळवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील दक्षिण ध्रुवावर सल्फर असल्याचा निर्वाळा प्रज्ञान रोव्हरने दिला आहे. त्याशिवाय, इतर धातू आणि ऑक्सिजनचे प्रमाण आढळले आहे. इस्रोकडून आता हायड्रोजनचा शोध सुरू आहे.
इस्रोने म्हटले की, "इन-सिटू (इन सिटू) वैज्ञानिक प्रयोग सुरू आहेत... इन-सीटू मापनाद्वारे, रोव्हरवरील 'लेझर-इंड्युस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप' (LIBS) या उपकरणाने प्रथमच दक्षिण ध्रुवावर सल्फर स्पष्टपणे शोधले आहे.
Al, Ca, Fe, Cr, Ti, Mn, Si, आणि O चा शोध लागला असून आता हायड्रोजनचा शोध सुरू असल्याचे इस्रोने म्हटले. LIBS नावाचा हा पेलोड बेंगळुरू येथील ISRO च्या इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स (LEOS) प्रयोगशाळेत विकसित केला गेला आहे.