(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid-19 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकार सतर्क; 'या' पाच राज्यांना लिहिलं पत्र
Covid-19 Case Increases : देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. कोरोनाची प्रकरणं आणि साप्ताहिक संसर्गाचं प्रमाण वाढण्याबाबत केंद्रानं पाच राज्यांना पत्र लिहिलं आहे.
Covid-19 Case Increases : देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाच्या (Covid-19) दैनंदिन रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. एवढंच नाहीतर साप्ताहिक संसर्ग दरही (Weekly Infection Rate) वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर आहे. केंद्र सरकारनं पाच राज्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोरपणे देखरेख ठेवण्याची आणि आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी असं अधोरेखित केलं आहे की, देशात काही राज्यांत कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. ज्यामुळे संसर्गाचा प्रसार वाढण्याचा धोका अधिक संभवतो, त्यामुळे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
भूषण म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य प्रतिसादावर जोखीम मूल्यांकन आधारित दृष्टिकोन अवलंबण्याची आवश्यक्यता आहे. तसेच, महामारीशी लढताना आतापर्यंत मिळालेलं यश गमावलं जाऊ नये. पत्रात त्यांनी गेल्या तीन महिन्यांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचा उल्लेखही केला आहे. दरम्यान, 27 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 15,708 नवीन रुग्णांसह कोरोनाबाधितांमध्ये काहीशी वाढ झाली आहे आणि 3 जून रोजी संपलेल्या आठवड्यात 21,055 पर्यंत वाढ झाली आहे. तसेच, 27 मे 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात 0.52 टक्के संसर्ग दर होता, तो 3 जून रोजी संपलेल्या आठवड्यात 0.73 टक्के इतका झाला आहे.
राज्यांना पत्रात सांगितलं की,...
पुराव्यावर आधारित निर्णय घेण्यावर अधिक लक्ष केंद्रित करून विविध क्रियाकल्प, स्क्रीनिंग आणि देखरेख, आरोग्य सुविधांचं व्यवस्थापन, लसीकरण आणि लोकांच्या सहभागासाठी मंत्रालयानं 8 एप्रिल 2022 रोजी जारी केलेल्या निर्देशांचं पालन करण्यास राज्यांना सांगण्यात आलं आहे. मंत्रालयानं जारी केलेल्या विविध सूचनांचं पालन करताना राज्यांना कोविड-19 साठी झटपट आणि प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजनांचं निरीक्षण आणि अंमलबजावणी सुरू ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
'या' 4 राज्यांत कोरोना रुग्णसंख्येत वाढ
केंद्र सरकारच्या पत्रानुसार, तामिळनाडूमध्ये साप्ताहिक नव्या कोरोनाबाधितांमध्ये वाढ झाली आहे. 27 मे रोजी संपलेल्या आठवड्यात तामिळनाडूत नोंदवण्यात आलेल्या 335 प्रकरणांची संख्या 3 जून रोजी संपलेल्या आठवड्यात 659 झाली. तर 3 जून रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील नव्या रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर हा 3.13 टक्के इतका आहे. केरळमध्ये नवीन रुग्णांमध्ये वाढ झाली असून 27 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 4,139 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 3 जून रोजी संपलेल्या आठवड्यात नव्या कोरोनाबाधितांची संख्या 6,556 इतकी होती.
महाराष्ट्रातील परिस्थिती काय?
गेल्या आठवड्यात राज्यातील कोरोना संसर्गाचं प्रमाण 5.2 टक्क्यांवरून 7.8 टक्क्यांवर पोहोचल्याचं केंद्रीय सचिव भूषण यांनी पत्रात नमूद केलं आहे. महाराष्ट्रात, 27 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 2,471 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 3 जून रोजी संपलेल्या आठवड्यात ही संख्या 4,883 इतकी होती. याशिवाय, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये या कालावधीत साप्ताहिक संसर्गाच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- पुन्हा वाढणाऱ्या कोरोनाला कसं रोखायचं? टास्क फोर्सच्या महत्वाच्या सूचना
- महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यानं टेन्शन वाढवलं, केंद्राचं राज्य सरकारला पत्र