1 कोटी मते द्या, 70 रुपयात दारु घ्या, भाजपच्या नेत्याचे जनतेला आश्वासन
2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयी केल्यास 70 रुपयांमध्ये दारु देणार असल्याचे आश्वासन या भाजपच्या नेत्याने दिले आहे. आंध्र प्रदेशचे भाजपचे अध्यक्ष सोमू वीरराजू यांनी हे वक्तव्य केले आहे.

Andhra Pradesh Assembly Elections : निवडणुकांच्या वेळी राजकीय नेते अनेकदा वादग्रस्त विधाने करत असतात. त्यांच्या विधानामुळे अनेकवेळा वादही निर्माण झाले आहेत. आंध्र प्रदेशमधील भाजपच्या नेत्यानेही आता असेच वक्तव्य केले आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला विजयी केल्यास 70 रुपयांमध्ये दारु देणार असल्याचे आश्वासन या भाजपच्या नेत्याने दिले आहे. आंध्र प्रदेशचे भाजपचे अध्यक्ष सोमू वीरराजू (Somu Veerraju) यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट केले आहे. मलिक यांनी 'दे दारू भाइ दे दारू' असे ट्वीट करत भाजपच्या नेत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
राज्यात 1 कोटी नागरिक दारू पितात. त्या सर्वांनी 1 कोटी मते भाजपला द्यावी, तुम्हाला 70 रुपयांमध्ये दारु देतो. जर चांगला महसूल मिळाला तर 50 रुपयांमध्येच दारु देतो असे जाहीर वक्तव्य वीरराजू यांनी केले आहे. सोमू वीरराजू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एस जगनमोहन रेड्डी यांच्यावरही टीका केली. तसेच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या तेलुगू देसम पार्टीवरही त्यांनी टीका केली. आंध्र प्रदेशला मोठा समुद्रकिनारा आणि विकासाची साधने असतानाही राज्यकर्त्यांनी कोणताही विकास केला नसल्याचे वीरराजू म्हणाले. त्यामुळे भाजपला निवडूण द्या, असे ते म्हणाले.
दारुच्या मुद्यावरुन आंध्र प्रदेशात मे महिन्यापासून चांगलेच राजकारण तापले आहे. मे महिन्यात जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारने नवीन दारू धोरण लागू केले. त्याअंतर्गत राज्यात दारूची दुकाने कमी करून ती खरेदी करणाऱ्यांसाठी तीन बाटल्यांची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. ऑक्टोबरमध्येमध्ये रेड्डी यांच्या सरकारने दारूसाठी दिलेला परवाना देखील क्षणार्धात रद्द केला होता. जगनमोहन यांनी राज्यात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर आंध्र प्रदेशमध्ये दारूच्या किंमती ७५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
गेल्या वर्षी जुलैमध्ये सोमू वीरराजू यांची आंध्र प्रदेश युनिटच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील रहिवासी असलेले सोमू वीरराजू यांनी भाजप युवा मोर्चासाठीही काम केले आहे. त्यांनी 1978 मध्ये आंध्र प्रदेश विद्यापीठातून B.Sc चे शिक्षण घेतले आहे. आंध्र प्रदेशातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी जुलै 2021 मध्ये मंदिर यात्रा काढली होती. या भेटीदरम्यान त्यांनी राज्यातील जगन मोहन सरकार हिंदूंवर हल्ले करत असल्याचा आरोप केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
