Army Day | आर्मी डे परेडला पुरुषांच्या पथकाचं नेतृत्त्व, कोण आहेत कॅप्टन तानिया शेरगिल?
दिल्लीच्या कॅंट परिसरातील आर्मी परेड ग्राऊंडमध्ये हे संचलन झालं. कॅप्टन तान्या शेरगिल यांनी आज सैन्य दिनाच्या निमित्ताने पुरुषांच्या सर्व पथकांचं नेतृत्त्व केलं.
नवी दिल्ली : आज 72वा सैन्य दिवस आहे. विशेष म्हणजे आज आर्मी डे परेडचं नेतृत्त्व कॅप्टन तानिया शेरगिल यांनी केलं. आर्मी डेच्या परेडं नेतृत्त्व एखाद्या महिला अधिकाऱ्याने करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सैन्यात दाखल होऊन देशाची सेवा करणाऱ्या तानिया या त्यांच्या कुटुंबातील चौथी पिढी आहे. दरम्यान, तानिया शेरगिल या प्रजासत्ताक दिवसाच्या परेडमध्येही सैन्याच्या पथकाचं नेतृत्त्व करणार आहेत. मात्र प्रजासत्ताक दिनाच्या परेडचं नेतृत्त्व एखाद्या महिलेच्या हाती देण्याची ही पहिलीच वेळ नाही.
दिल्लीच्या कॅंट परिसरातील आर्मी परेड ग्राऊंडमध्ये हे संचलन झालं. या निमित्ताने लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या हस्ते अनेक जवानांना सन्मानित करण्यात आलं. कॅप्टन तानिया शेरगिल यांनी आज सैन्य दिनाच्या निमित्ताने पुरुषांच्या सर्व पथकांचं नेतृत्त्व केलं. तानिया शेरगिल या सैन्याच्या सिग्नल कोरमध्ये कॅप्टन आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन्समध्ये बीटेक केल्यानंतर तान्या यांनी सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये चेन्नईमध्ये ऑफिसर ट्रेनिंग अकादमीतून प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या सैन्यात दाखल झाल्या.
चौथी पिढी सैन्यात सैन्यात दाखल होणाऱ्या तानिया त्यांच्या कुटुंबातील चौथी पिढी आहे. त्यांचे वडील सैन्याच्या 101 मीडियम रेजिमेंट तोफखाना (आर्टिलरी), आजोबा चौदाव्या सशस्त्र रेजिमेंट (सिंडी होर्स) आणि पणजोबा शिख रेजिमेंटमध्ये पायदळ सैनिक (इन्फ्रंट्री) म्हणून सेवा केली आहे. तानिया शेरगिल यांना देशसेवा आणि सैनिकी शिस्त वारसाहक्कानेच मिळाली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
भावना कस्तुरी यांनीही केलं प्रजासत्ताक दिन परेडचं नेतृत्त्व याआधी म्हणजेच मागील वर्षी कॅप्टन भावना कस्तुरी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्व पुरुषांचं नेतृत्त्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. तानिया शेरगिर यांचं कौतुक यासाठी आहे की अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला..
आर्मी डे का साजरा केला जातो? फील्ड मार्शल केएम करियप्पा यांच्या सन्मानार्थ आर्मी डे साजरा केला जातो. आजच्याच दिवशी 1949 मध्ये करियप्पा यांनी सैन्याचे पहिले कमांडर-इन-चीफ म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. 1947 च्या भारत-पाकिस्तान युद्धात करियप्पा यांनी सैन्याचं नेतृत्त्व केलं होतं. करियप्पा यांना 1986 मध्ये दुसरे फील्ड मार्शलच्या किताबाने सन्मानित करण्यात आलं होतं. तर सॅम मानेकशॉ भारताचे पहिले फील्ड मार्शल होते. त्यांचा 1973 मध्ये फील्ड मार्शल किताबाने गौरवण्यात आलं होतं.