Cabinet Expansion : मोदींच्या कालच्या विस्तारात रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र कनेक्शन कायम
रेल्वेच्या सगळ्या महसूलात महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे. त्या बदल्यात महाराष्ट्राला किती न्याय मिळतो हा भाग वेगळा. पण एक प्रमुख औद्योगिक केंद्र असल्यानं महाराष्ट्राचं महत्व अबाधित आहे
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पीयुष गोयल यांचं रेल्वेमंत्री पद गेलं. त्यामुळे महाराष्ट्राचा मंत्री रेल्वे मंत्रालयातून गेला खरा. पण महाराष्ट्राचं रेल्वेमंत्रालयातलं अस्तित्व मात्र दानवेंच्या रुपानं कायम राहिलं. कालच्या फेरबदलात दानवेंना ग्राहक संरक्षण राज्यमंत्रीपदावरुन रेल्वे खात्यात आणलं गेलं...त्यामुळे महाराष्ट्र आणि रेल्वे मंत्रालय हे जुनं कनेक्शनही पुन्हा स्थापित झालं. लोकांशी निगडीत असलेलं खातं मिळाल्यानं दानवेंच्या चेह-यावरही तो आनंद पदभार घेताना दिसत होता.
आणीबाणीनंतर जनता पक्षाचं सरकार आलं तेव्हा मधु दंडवते हे रेल्वेमंत्री होते. कोकणासारख्या दुर्गम भागात रेल्वे पोहचण्याचं स्वप्न याच काळात पाहिलं गेलं. नंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्या काळात या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरु राहिली. जॉर्ज यांची कर्मभूमी ही मुंबई होती.
केंद्रात मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस यांच्याशिवाय राम नाईक, सुरेश प्रभू, पीयुष गोयल यांनी हे रेल्वेमंत्रीपद सांभाळलं आहे. हे सगळे नेते महाराष्ट्राचे. त्यातही मोदी सरकारच्या काळात 2014 पासून सतत कुणी ना कुणी महाराष्ट्रीयन रेल्वे मंत्रालयात राहिला आहे. सुरेश प्रभू पहिल्या टर्ममध्ये रेल्वेमंत्री होते. त्यांच्याकडून हे खातं काढून घेतलं पण ते आलं पीयुष गोयल यांच्याकडे आणि आता पीयुष गोयल यांना रेल्वे मंत्रालयातून हटवलं गेलं तरी राज्यमंत्री म्हणून दानवेंच्या रुपानं तिथं एक मराठी माणूस मात्र कायम आहे.
बिहार, यूपीसारख्या राज्यांकडे सुद्धा हे रेल्वेमंत्रालय अनेकदा राहिलं आहे. पण मुळात रेल्वेच्या सगळ्या महसूलात महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे. त्या बदल्यात महाराष्ट्राला किती न्याय मिळतो हा भाग वेगळा. पण एक प्रमुख औद्योगिक केंद्र असल्यानं महाराष्ट्राचं महत्व अबाधित आहे..कदाचित त्याचीच झलक रेल्वेत महाराष्ट्राच्या अस्तित्वानं दिसत असावी.
महाराष्ट्रातील मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार स्विकारला असून रावसाहेब दानवे यांचं खातं कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात बदललं. त्यांनी आज रेल्वे राज्यमंत्री म्हणून कारभार स्वीकारला. तर नारायण राणे यांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम विभागाची सूत्र हाती घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. भारती पवार यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांची धुरा सोपवण्यात आली. आज सकाळी त्यांनी आरोग्य राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.