मोदींच्या मंत्रिमंडळात के व्ही कामथ आणि स्वपन दासगुप्ता यांची वर्णी लागण्याची शक्यता
मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अर्थसंकल्पाआधी होण्याची शक्यता आहे. नव्या मंत्रिमंडळात के व्ही कामथ आणि स्वपन दासगुप्ता यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : न्यू डेव्हलपमेंट (ब्रिक्स) बँकेचे विद्यमान संचालक के व्ही कामथ यांचा मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कामथ यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कामथ यांच्यासोबत राज्यसभेचे खासदार स्वपन दासगुप्ता हेदेखील केंद्रीय मंत्रिमंडळात येत्या काळात दिसू शकतात.
के व्ही कामथ यांना अर्थराज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळू शकते. कामथ यांनी याआधी आयसीआयसीआय आणि इन्फोसिसचं संचालक पद भूषवलं आहे. देशातील बेस्ट बँकर्समध्ये त्यांचा समावेश होतो. कामथ यांच्यावर आणखी मोठ्या जबाबदाऱ्या भविष्यात देण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.
तर दासगुप्ता यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील अनेक विद्यापीठे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारित येतात. सध्या देशातील अनेक विद्यापीठं वादाचं भोवऱ्यात आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश होणार असेल तर निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनाही संधी मिळू शकते. याशिवाय माजी वाणिज्य मंत्री आणि रेल्वे मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणारे सुरेश प्रभू यांचंही मंत्रिमंडळात पुनरागमन होऊ शकतं.
मोदी सरकारने आपला आठ महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या कामगिरीच्या आधारावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. केंद्रच्या अर्थसंकल्पाआधी मंत्रिमंडळात बदल होण्याची चिन्ह आहेत.