पाकिस्तानातून आलेल्या मुस्लीम महिलेला गुजरात सरकारकडून भारतीय नागरिकत्व बहाल
भारत सरकारकडून पाकिस्तानातून आलेल्या एका मुस्लीम महिलेला कोणत्याही नियमांचे सोपस्कार न करता केवळ मेरीट आणि मानवता अधिकाराच्या आधारावर भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे.
गांधीनगर : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात काही ठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. हा कायदा मागे घेण्यात यावा, यासाठी विरोधी पक्ष मागणी करत आहे. याचदरम्यान भारत सरकारकडून पाकिस्तानातून आलेल्या एका मुस्लीम महिलेला कोणत्याही नियमांचे सोपस्कार न करता केवळ मेरीट आणि मानवता अधिकाराच्या आधारावर भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. हसीनाबेन अब्बासअली वरसारीया असे या महिलेचे नाव आहे.
एकीकडे नागरिकत्व दुरुस्ती कायदा संमत झाल्यापासून देशभरात मोठा गदारोळ माजला आहे. या कायद्याअन्वये पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या हिंदू, शीख, पारशी, ख्रिस्ती, जैन आणि बौद्ध धर्मीयांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे. मात्र भारतात अवैध मार्गाने घुसलेल्या बांगलादेशी, पाकिस्तानी, अफगाणिस्तानी नागरिकांना मायदेशी परतावे लागणार आहे. याचदरम्यान पाकिस्तानातून आलेल्या एका मुस्लीम महिलेला भारताने नागरिकत्व बहाल केल्यामुळे लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार हसीनाबेन या मूळ भारतीय आहेत. 1999 साली त्यांचे लग्न झाल्यानंतर त्या पाकिस्तानात गेल्या होत्या. परंतु त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या परत भारतात आल्या. गेल्या वर्षी त्यांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. 18 डिसेंबर 2019 रोजी त्यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले.
गुजरातमधील द्वारका जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे हसीनाबेन यांनी पत्राद्वारे नागरिकत्वाची मागणी केली होती. काल द्वारकाचे जिल्हाधिकारी नरेंद्र कुमार मीणा यांनी हसीनाबेन अब्बासअली वरसारीया यांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले. नरेंद्र कुमार यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे.
અરજદાર શ્રી હસીનાબેન અબ્બાસઅલી વરસારીયાને ભારતીય નાગરિકતા પ્રમાણપત્ર આજરોજ આપવામાં આવ્યું.@CMOGuj @HMofficeGujarat @pkumarias pic.twitter.com/g7Zd5NZkZh
— Collector Dwarka (@COLLECTORDWK) December 18, 2019