Black Fungus : कोरोना झालेला नाही, तरी काळ्या बुरशीचा धोका आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
Black Fungus : कोरोनाबाधित झाल्यानंतर रुग्णांना ब्लॅक फंगस म्हणजेच, काळ्या बुरशीचा अधिक धोका असल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय. पण ज्यांना कोरोना झालेला नाही, त्यांना ब्लॅक फंगसचा धोका असतो की, नाही, या प्रश्नावर तज्ज्ञांचं महत्त्वाचं मत समोर आलं आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात थैमान घातलं असतानाच आता 'म्युकर मायकोसिस' म्हणजेच ब्लॅक फंगस (Black Fungus) नावाच्या आजारानं डोकं वर काढलं आहे. अशातच तज्ज्ञांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. आतापर्यंत ब्लॅक फंगसचा धोका केवळ कोरोनाबाधित झालेल्या व्यक्तींनाच असल्याचा समज आहे. परंतु, तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक फंगस म्हणजेच, काळी बुरशीचा आजार कोरोनाची लागण न झालेल्यांनाही होऊ शकतो. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे. तसेच ज्यांना डायबिटीज, आतड्यांचे आजार किंवा हृदयासंबंधित आजार आहेत, अशा व्यक्तींना ब्लॅक फंगसचा धोका अधिक असून अशा व्यक्तींनी सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे.
नीति आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ब्लॅक फंगस हा आजार कोरोनाच्या आधीपासून अस्तित्वात आहे. ब्लॅक फंगसबाबत वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जे शिकवलं जातं ते म्हणजे, हा आजार डायबिटीज असलेल्यांना बाधित करु शकतो. अनियंत्रित मधुमेह आणि इतर काही गंभीर आजार असलेल्यांना ब्लॅक फंगस होऊ शकतो."
ब्लॅक फंगस म्हणजेच, काळ्या बुरशीच्या आजाराच्या गंभीरतेबाबत बोलताना वीके पॉल म्हणाले की, "ब्लड प्रेशरची पातळी 700-800 पर्यंत पोहोचते. या परिस्थितीला कीटोअसिडोसिस म्हणतात. ब्लॅक फंगसची लागण लहान मुलांसोबतच वृद्ध व्यक्तींना होते. न्युमोनियासारख्या इतर आजारांचा धोकाही अधिक असतो. आता कोरोनामुळे या आजाराचा धोका वाढला आहे. परंतु, कोरोना न झालेल्या व्यक्तींना इतर आजार असतील तर त्यांनाही ब्लॅक फंगसची लागण होऊ शकते." तसेच एम्स रुग्णालयाच्या डॉ. निखिल टंडन यांचं म्हणणं आहे की, निरोगी व्यक्तींना ब्लॅक फंगसबाबात चिंता करण्याची गरज नाही. ज्या लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असते, त्यांना ब्लॅक फंगसचा धोका अधिक आहे.
कोणत्या लोकांना काळ्या बुरशीचा संसर्ग होण्याची भीती आहे?
कोरोनाबाधित किंवा त्यातून बरे झालेल्या व्यक्तीला काळी बुरशीचा संसर्ग नाक, डोळे, सायनस आणि काही प्रकरणांमध्ये मेंदूलाही होता. ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, साखर, मूत्रपिंड रोग, हृदयरोग आणि ज्यांना वयाशी संबंधित समस्या आहेत किंवा ज्यांना संधिवात सारख्या आजारांमुळे औषधे घ्यावी लागतात, अशा लोकांमध्ये काळ्या बुरशीचा आजार जास्त प्रमाणात पसरत आहे.
रूग्णांना स्टिरॉइड्स दिल्यास त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते, ज्यामुळे बुरशीला वाढण्यास संधी मिळते. या प्रकरणात, डॉक्टरांच्या योग्य देखरेखीखाली स्टिरॉइड्सचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. कोरोना रूग्णांकरिता स्टिरॉइड्सला जीवनरक्षक उपचार मानले जाते, मात्र, याचे काही दुष्परिणामही समोर येत आहे.
देशात काळ्या बुरशीच्या जवळपास 9000 रुग्ण
देशात म्यूकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेनंतर काळ्या बुरशी आजाराचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत देशात या गंभीर आजाराची सुमारे नऊ हजार केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. अनेक राज्यांनी ब्लॅक फंगसला साथीचा रोग जाहीर देखील केला आहे. देशातील काळ्या बुरशीबद्दल नवीन माहिती जाणून घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी तज्ज्ञांच्या हवाल्यानं दिलेल्या आहेत. ABP Majha यातून कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
देशात काळ्या बुरशीच्या जवळपास 9000 केसेस; केंद्राकडून अॅम्फोटेरिसिन-बीच्या 23 हजार कुपी वितरीत