J P Nadda : भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीची फॉर्च्युनर कार चोरीला; पोलिसांत गुन्हा दाखल
Delhi Crime News : नड्डा यांच्या चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून कारचा शोध घेतला जात आहे.
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे (BJP) अध्यक्ष जेपी नड्डा (J. P. Nadda) यांच्या पत्नीची फॉर्च्युनर कार (Fortuner Car) चोरीला गेली आहे. कारची सर्विसिंग करण्यासाठी चालक दिल्लीतील गोविंदपुरी येथे गाडी घेऊन गेला होता. दरम्यान, 19 मार्च रोजी सर्व्हिस सेंटरमधूनच कार चोरीला गेली. त्यामुळे चालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिसांकडून कारचा शोध घेतला जात आहे. थेट नड्डा यांच्या पत्नीची कार चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
देशात सध्या निवडणुकीचे वातावरण असून, सर्वच पक्षाचे महत्वाचे नेते चर्चेत आहेत. मात्र, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. त्यांच्या पत्नीची फॉर्च्युनर कार चोरीला गेल्याची घटना समोर येताच याची राजकीय वर्तुळात देखील जोरदार चर्चा आहे. वाहन चोरीच्या घटना मागील काही दिवसांत वाढल्या आहेत. मात्र, सर्वसामान्य व्यक्तीची वाहन चोरीला गेल्यावर अनेकदा त्याची दखल देखील घेतली जात नाही. मात्र, आता थेट देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाच्या पत्नीचीच कार चोरीला गेल्याने चर्चेचा विषय बनला आहे.
वाहन चोरीच्या घटनांमध्ये अडीच पटाने वाढ....
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांत सातत्याने वाढ होत आहे. एक मीडिया रिपोर्टनुसार दिल्ली-एनसीआरमध्ये दर 14 मिनिटांनी एक वाहन चोरीची घटना उघडकीस येते. त्याचप्रमाणे ACKO ने काही दिवसांपूर्वी वाहन चोरीच्या घटनांवर आधारित 'थेफ्ट अँड द सिटी 2024' ची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली होती. ज्यामध्ये 2022 आणि 2022 वर्षात देशात वाहन चोरीच्या घटनांमध्ये 2.5 पट वाढ झाल्याची नोंद करण्यात आली होती.
'या' तीन दिवसांत सर्वाधिक वाहन चोरीच्या घटना...
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (दिल्ली-एनसीआर) मध्ये दर 14 मिनिटांनी एक वाहन चोरीची घटना घडते. 2023 मध्ये दररोज सरासरी 105 वाहन चोरीचे प्रकरणे नोंदवली गेली आहे. सर्वाधिक वाहन चोरीच्या घटना मंगळवार, रविवार आणि गुरुवार या तीन दिवशी घडल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे दिल्लीकरांनी या तीन दिवसांत आपल्या वाहनांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
गाडीत जीपीएस लावण्याचे आवाहन...
फक्त दिल्लीतच नव्हे तर देशातील प्रत्येक महत्वाच्या शहरात वाहन चोरीच्या घटना वाढतांना पाहायला मिळत आहे. एवढंच काही तर मॉलमधील पार्किंगमधून देखील वाहन चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे वाहन चोरीला गेल्यास आपले वाहन तात्काळ परत मिळवण्यासाठी गाडीत जीपीएस लावण्याचे आवाहन सतत पोलिसांकडून केले जाते. जर, आपल्या गाडीत जीपीएस असेल, तर गाडी चोरीला गेल्यास ती गाडी कुठे आहे याची लगेच माहिती मिळू शकते आणि आपण ती गाडी पकडू शकतो. मात्र, जीपीएस लावतांना तो अशा जागी लावावा की, गाडी चोरणाऱ्या लोकांना लगेच सापडणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या :
भाजपची पाचवी उमेदवार यादी जाहीर, पायउतार झालेल्या न्यायमूर्तींना तिकिट, मनेका गांधीही रिंगणात