(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BJP Meeting: भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक, पंतप्रधान मोदीही उपस्थित
BJP Mukhyamantri Parishad Meeting : राजधानी दिल्लीमध्ये भाजप शासित राज्यांतील मुख्यमंत्री (CM) आणि उपमुख्यमंत्र्यांची (Deputy CM) बैठक सुरु आहे.
BJP Mukhyamantri Parishad Meeting : राजधानी दिल्लीमध्ये भाजप शासित राज्यांतील मुख्यमंत्री (CM) आणि उपमुख्यमंत्र्यांची (Deputy CM) बैठक सुरु आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची खास उपस्थिती आहे. भाजपच्या मुख्यमंत्री परिषदेच्या या बैठकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी (CM Yogi), उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, गोवाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.
बैठकीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केशव मौर्य, ब्रजेश पाठक, देवेंद्र फडणवीस, बिरेन सिंह बसवराज बोम्बई, जयराम ठाकूर हे दिग्गज नेताही उपस्थित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीमध्ये पक्षाच्या सुशासन धोरणावर चर्चा होणार आहे. त्यासोबतच सर्व राज्याचे मुख्यमंत्री आपापल्या राज्यातील विकास आणि कल्याणकारी योजनांचा रिपोर्ट प्रस्तुत करतील. मुख्यमंत्री आपल्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीच्या मार्गांसह तसेच त्यात गरीब आणि मागासवर्गीयांचा समावेश करण्यासाठी आपला अहवाल बैठकीमध्ये केंद्रीय नेतृत्वासमोर सादर करणार आहेत.
बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
दिल्लीमध्ये सुरु झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले विचार मांडतील. भाजपच्या मुख्यमंत्र्यांना विकास कामांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबतही चर्चा होणार आहे. त्याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्याच्या उत्सवाबाबत चर्चा करतील. त्याशइवाय हर घर तिंरगा अभियानाबाबात चर्चा करणार आहेत. आझादीच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.
याआधी उत्तर प्रदेशमध्ये झाली होती बैठक -
याआधी डिसेंबर 2021 मध्ये उत्तर प्रदेशच्या (UP) वाराणसी (Varanasi) येथे बैठक पार पडली होती. तेव्हा 12 भाजप (BJP) शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले होते. आता पुन्हा एकदा भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांची बैठक होत आहे. यामध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शनही करणार आहेत.