(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BJP attacks Gandhi : कॉंग्रेसची नौटंकी तर जनतेनं कधीच बंद केली, प्रकाश जावडेकरांची टीका
पंतप्रधान देशाच्या जनतेसोबत कोरोनाचा सामना करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना राहुल गांधी नौटंकी हा शब्द वापरत आहे. हा देशाचा आणि जनतेचा अपमान असल्याचे प्रकाश जावडेकर म्हणाले.
नवी दिल्ली : राहुल गांधींनी देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला पंतप्रधानांची नौटकी जबाबदार असल्याचा घणाघात आज पत्रकार परिषदेत केला. साहजिकच त्यावर भाजपनं तातडीनं या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींच्या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, त्यांची नौटंकी जनतेनं तर कधीच बंद केली आहे.
जावडेकर म्हणाले, पंतप्रधान देशाच्या जनतेसोबत कोरोनाचा सामना करत आहेत. तेव्हा त्यांच्या या प्रयत्नांना राहुल गांधी नौटंकी हा शब्द वापरत आहे. हा देशाचा आणि जनतेचा अपमान आहे. आम्हाला नौटंकीसारखे शब्द वापरायचे नाहीत. पण त्यांची नौटंकी तर जनतेनं कधीच बंद केली आहे.
2024 नाही तर या वर्षी मिळणार सर्वांना लस
राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केंद्राकडे लसीकरणाचं धोरणच नसल्याची टीका केली. शिवाय देशात या वेगानं लसीकरण सुरु राहिलं तर लसीकरण पूर्ण व्हायला 2024 उजाडेल असे म्हणाले. यावर उत्तर देताना जावडेकर म्हणाले, लसीबाबत कॉंग्रेसने संभ्रम निर्माण केला. एवढचं नाही तर कॉंग्रेसच्या एका मंत्र्याने भाजपची लस असे म्हटलं होते. काँग्रेस त्यावर शंका उपस्थित करत होते. राहुलजी, लसीला विरोध तुम्ही केला आहे. लसीकरण पूर्ण व्हायला 2024 नाही तर डिसेंबर 2021 पर्यंत लसीकरण पूर्ण होईल. डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत 108 कोटी भारतीयांचं लसीकरण पूर्ण होईल."
कॉंग्रेसवर टीका करताना जावडेकर म्हणाले तुम्हाला जर लसीकरणाची एवढीच काळजी आहे तर जरा काँग्रेसशासित राज्यांकडे लक्ष द्या. राजस्थानमध्ये दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना वाढत आहे. बलात्कारासाठी रुग्णवाहिकेचा वापर करण्यात आला आहे. एका महिला खासदारावर कॉंग्रेसच्या गुंडांनी हल्ला केला. देशाला उपदेश देण्यापेक्षा आपल्या राज्याकडे लक्ष द्या.
सरकार विरोधी पक्षांना शत्रू समजतयं असा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, "विरोधी पक्षांनी फेब्रुवारीमध्ये केलेल्या सूचना पंतप्रधानांनी स्वीकारल्या नाहीत. देशात कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला पंतप्रधानच जबाबदार आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले होते.