Bengaluru Murder Case: मराठी गाणं, गौरीचे टोमणे अन् ती संध्याकाळ; मस्करीची कुस्करी झाली? बंगळुरु हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Bengaluru Murder Case: राकेशने आपल्या कबुली जबाबात सांगितले की, 26 मार्चच्या संध्याकाळी राकेश आणि गौरी यांनी घरी सोबत काही वेळ घालवला. नंतर ते फिरायला जवळच्या मोकळ्या जागेत गेले. परत आल्यानंतर सगळं चित्र पालटलं.

Bangalore Crime: बंगळुरुतील एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कामाला असणाऱ्या राकेश खेडेकर (Rakesh Khedekar) याने पत्नी गौरी सांबरेकर (Gauri Sambarekar) हिचा चाकू भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. राकेश खेडेकर आणि गौरी सांबरेकर हे दोघेही मुंबईत राहणारे होते. दोन वर्षांपूर्वी राकेश आणि गौरीचे लग्न झाले होते. त्याचबरोबर ते दोघे एक-दोन महिन्यापूर्वी दोघेही बंगळुरू येथे शिफ्ट झाले होते. दोघांमध्ये वारंवार वाद होत होता. या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले जेव्हा त्याने गौरीच्या भावाला फोन करून तिची हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणामध्ये अनेक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राकेशने त्या दिवशी काय घडलं याची सविस्तर माहिती पोलिसांना दिली आहे.
नवीन नोकरी शोधून नवीन आयुष्य सुरू करू
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिस चौकशीदरम्यान राकेशने कबूल केले की, त्याची पत्नी गौरी नेहमीच आई-वडील आणि त्याच्या लहान बहिणीचा अपमान करत असल्याने तो नाराज होता. गौरी नेहमी माझ्या वडिलांबद्दल, आई आणि बहिणीबद्दल वाईट बोलायची. ती नेहमी घरात आणि बाहेर त्यांचा अपमान करायची. तिने आपण बंगळुरूला जाऊ, नवीन नोकरी शोधून नवीन आयुष्य सुरू करू असं सुचवलं होतं. शाळेच्या दिवसांपासूनच ती माझ्यासोबत अशी वागायची. पण माझं तिच्यावर खूप प्रेम होतं. तिला बंगळुरूमध्ये आल्यानंतर देखील जवळपास एक महिना नोकरी न मिळाल्याने, आम्ही परत मुंबईला जावे अशी तिची इच्छा होती आणि यावरून अनेकदा वादही व्हायचा.
दौघांनी घरी सोबत छान वेळ घालवला
राकेशने आपल्या कबुली जबाबात सांगितले की, 26 मार्चच्या संध्याकाळी राकेश आणि गौरी या दौघांनी घरी सोबत छान वेळ घालवला. नंतर ते दोघे फिरायला जवळच्या मोकळ्या जागेत गेले. घरी परतत असताना त्याने दारू आणि स्नॅक्स (काही खाण्यासाठीची) खरेदी केली. सायंकाळी 7.30 च्या सुमारास ते घरी पोहोचले. काम आटोपल्यानंतर राकेश जवळपास दररोज दारू प्यायचा. गौरी त्याच्यासोबत बसायची. त्याला स्नॅक्स बनवून द्यायची, ते दोघेही सोबत गाणी ऐकायचे.
राकेशच्या तोंडावरती ती वारंवार फुंकत राहिली
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबतची माहिती देताना सांगितले की, त्या रात्री घरी आल्यावरती दोघांनीही आपापली आवडती गाणी आळीपाळीने लावण्याचे मान्य केलं. गौरी भात बनवत असताना राकेश दारू पिण्यासाठी ग्लास घेऊन बसला आणि गाणी लावून ऐकू लागला. काही गाणी ऐकल्यानंतर गौरीची तिची आवडती गाणी लावण्याची वेळ आली, तेव्हा तिने एक मराठी गाणे लावले. ज्यामध्ये वडील आणि मुलाच्या नात्याबद्दल काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. तिने गाण्यांनी खिल्ली उडवली. ती त्याच्या तोंडाजवळ गेली, तिने तिचे गाल फुगवले आणि राकेशच्या तोंडावरती ती वारंवार फुंकत राहिली. राकेशने चिडून तिला बाजूला ढकलले. ती किचनजवळ पडली. तिने चिडून किचनमधून चाकू उचलला आणि शिवीगाळ करत त्याच्यावर फेकला. रागाच्या भरात राकेशने रात्री 8.45 ते 9 च्या दरम्यान चाकू उचलून तिच्या मानेवर दोनदा पोटात वार केले. खूप रक्तस्त्राव झाला होता. तो तिच्या शेजारी बसला आणि तिला सांगू लागला की, तिच्या वागण्याने त्याची चिडचिड होते आहे.
राकेशने तिच्यावरती चाकूने वार केल्यानंतर..
यावेळी राकेशने सांगितले की मुंबईला परत जाण्यासाठी गौरीने सुटकेस रिकामी केलेली होती. राकेशने तिच्यावरती चाकूने वार केल्यानंतर तिच्या हाताची नाडी तपासली आणि तेव्हा त्याला ती जाणवली नाही. तिला मृत समजून त्याने गौरीला सुटकेसमध्ये भरले. तो त्या सुटकेसला किचनमधून बाथरूमकडे खेचत असताना सुटकेसचे हँडल तुटले. तिच्यावरती वार केल्यानंतर खाली पडलेले रक्त पुसण्यासाठी राकेशने सुटकेस बाथरूमच्या जवळ ठेवली. त्यांनी घराची साफसफाई केली. मृतदेह सोबत न घेऊन जाता, त्याने घराला कुलूप लावलं आणि तो 12.45 च्या सुमारास निघून गेला. तो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील शिरवळला पोहोचला, जिथे त्याला पकडण्यात आले.





















