(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Belgaum : बेळगावात तोतया वकील, त्यांच्या तक्रारीवरुन खऱ्या वकिलांवर गुन्हे दाखल; कारवाईसाठी रस्त्यावर ठिय्या
Belgaum Court Protest News : बेळगाव जिल्हा न्यायालयात कोणतीही सनद नसताना काही तोतया वकील वकिली करत असल्याची तक्रार करत इतर वकिलांनी रस्त्यावरच आंदोलन सुरू केलं.
बेळगाव : जिल्हा न्यायालयामध्ये बेकायदेशीररित्या, बिनबोभाट वकिली व्यवसाय करणाऱ्या तोतया वकील तसेच या वकिलांच्या तक्रारीवरून खऱ्या वकिलांवर गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बेळगाव न्यायालयातील वकिलांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन छेडले. सोमवारी सायंकाळी हे आंदोलन आश्वासन मिळाल्यावर मागे घेण्यात आले.
तोतया वकिलांच्या कारभाराबद्दल आणि उपदव्यापामुळे संतप्त झालेल्या वकिलांनी वीर राणी कित्तूर चन्नमा चौकात मानवी साखळी करून वाहतूक रोखून धरली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सायंकाळ पर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आपल्या आंदोलन व मागण्या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना वकिलांनी सांगितले की, बेळगाव वकील संघटनेमध्ये सोनिया व्यंकटेश धारा (मूळ रा. गांधीवाढ, जि. धारवाड), प्रतिभा जे. कदम (रा. कित्तूर) आणि जुवैद अफजल निजामी (रा. वीरभद्रनगर, बेळगाव) अशा नावाचे तीन तोतये वकील आहेत.
वकिली व्यवसायासाठी आवश्यक कोणतीही परीक्षा हे तिघे उत्तीर्ण झालेले नाहीत. वकिलीची सनद नसताना ते बिनधास्त न्यायालयात येऊन वकिली व्यवसाय करत आहेत. लोकांकडून पैसे घेऊन दुसऱ्याच्या नावावर वकालत घालून हे तिघे खटले लढवत असतात. तेव्हा बेळगावच्या जनतेने या तीन तोतया वकिलांच्या पासून सावध राहावे. त्यांच्याकडे खटले आणि त्यासाठी पैसे, कागदपत्रे देऊन स्वतःला मनस्ताप, नुकसान करून घेऊ नये. सदर तोतया वकिलांविरुद्ध मार्केट पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करून देखील त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे असा आरोप देखील वकिलांनी केला.
शहर पोलीस आयुक्तांनी त्या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे असे सांगत लोकांना न्याय मिळवून देणाऱ्या वकिलांवरच आज स्वतःला न्याय मिळावा यासाठी झगडावे लागत असल्याचे खेदाने सांगितले. त्याचप्रमाणे संबंधित तोतया वकिलांना बेळगावमध्ये वकिली व्यवसाय करण्यास परवानगी दिली जाऊ नये. अन्यथा वकिलांबाबत समाजात चुकीचा संदेश जाईल. जनतेने देखील या वकिलांपासून सावध राहावे, असे आवाहन वकिलांनी केले.