BBC Documentary Row : जेएनयूनंतर जामिया यूनिवर्सिटीमध्येही राडा, चार विद्यार्थ्यांना अटक
Jamia BBC Documentary Screening Row : जेएनयूनंतर जामिया यूनिवर्सिटीमध्येही या डॉक्युमेंटरीमुळे वाद निर्माण झालाय
Jamia BBC Documentary Screening Row : गुजरात दंगलीला आता 20 वर्षे उलटून गेलीत. पण त्याच घटनेवर आधारित नुकतीच प्रदर्शित झालेली बीबीसीची एक डॉक्युमेंटरी मात्र सध्या वादात आहे. काल दिल्लीच्या जेएनयू (JNU) मध्येही त्यावरुन पुन्हा डावे आणि उजवे आमनेसामने आले. जेएनयूनंतर जामिया यूनिवर्सिटीमध्येही या डॉक्युमेंटरीमुळे वाद निर्माण झालाय. जामिया यूनिवर्सिटीमधून डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगमुळे चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलंय. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) सांगितलं की, बुधवारी जामिया यूनिवर्सिटीच्या बाहेर बीबीसीच्या एका डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगमुळे गदारोळ झाला होता. याप्रकरणी चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बीबीसीच्या डॉक्युमेंटरीमुळे जे एन यू..अर्थात जवाहरलाल नेहरु विद्यापीठ पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. यावेळी निमित्त आहे पंतप्रधान मोदींवरील बीबीसीच्या डॉक्युमेंटरीचं...मंगळवारी या डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगवरुन जेएनयू विद्यापीठात पुन्हा डावे आणि उजवे आमनेसामने आले..स्क्रीनिंग होऊ नये यासाठी तब्बल तीन तास लाईट बंद ठेवल्या गेल्याचा आरोप आहे. लॅपटॉपवर दाखवायला सुरुवात झाली.. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्याचाही आरोप केला आहे.
इंडिया द मोदी क्वेश्चन..ही बीबीसीची डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाल्यापासूनच भारतात वादात आहे. केंद्र सरकारनं ती युट्युबवरुन हटवली, ट्विटरवर कुणाला त्याबाबत प्रसारास बंदी करण्यात आलीय. याच डॉक्युमेंटरीचं स्क्रीनिंग करण्यासाठी डाव्या संघटनांनी तयारी सुरु केली. पण ज्या वेळेला ही डॉक्युमेंटरी दाखवली जाणार होती, त्याच्या अर्धा तास आधी विद्यापीठाच्या एक तृतीयांश कॅम्पसमधली लाईटच गायब झाली.
इंडिया द मोदी क्वेश्चनवरुन एवढा वाद का सुरु आहे?
2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी बीबीसीची ही 59 मिनिटांची डॉक्युमेंटरी आहे. ब्रिटीश फॉरेन ऑफिसच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं हा माहितीपट तयार करण्यात आला आहे. भाजप समर्थकांचं म्हणणं आहे की, सुप्रीम कोर्टानं याबाबत एकदा निर्णय दिल्यानंतर विदेशी मीडिया अजूनही यात मोदींना अडकवू पाहतोय. तर दुसरीकडे बीबीसी आपल्या माहितीपटावर ठाम आहे, सर्व मतांना स्थान देऊन भारताच्या इतिहासातली एका महत्वाच्या घटनेवर हा माहितीपट बनवल्याचा त्यांचा दावा आहे.
कालच हैदराबाद विद्यापीठातही बीबीसीच्या या डॉक्युमेंटरीचं स्क्रीनिंग करण्यात आलं होतं. त्यानंतर विद्यापीठानं आता संबंधितांना नोटीस बजावलीय. आता दिल्लीतल्या जामिया विद्यापीठातले विद्यार्थीही स्क्रीनिंगच्या तयारीत आहेत. कोलकाताच्या विद्यापीठातही मोठ्या स्क्रीनवर ही डॉक्युमेंटरी दाखवणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. त्यामुळे या डॉक्युमेंटरीवरुन सुरु झालेली वादाची ठिणगी पुढच्या काही दिवसात वाढतच जाण्याची शक्यता आहे.