उत्तराखंड जोशीमठजवळ दरड कोसळली, बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे ठप्प; बद्रीनाथमधले हजारो पर्यटक अडकले
Char Dham Yatra 2023: चमोली जिल्ह्यातील एका गावात बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळल्यानं बद्रीनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. महामार्गावर ढिगारा पडल्यानं हजारो प्रवासी अडकून पडले आहेत.
Char Dham Yatra: उत्तराखंडमधील (Uttarakhand) जोशीमठजवळ (Joshimath) काल (गुरुवार) दरड कोसळली आहे. यामुळे बद्रीनाथ महामार्ग (Badrinath Highway) पूर्णपणे ठप्प झाला आहे. दोन्ही बाजूचे हजारो पर्यटक अडकले आहेत. जोशीमठजवळील हेलंग खोऱ्यात एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाचं काम सुरू आहे. त्यासाठी जमिनीखाली सुरूंग लावले जात आहेत. काल अशाच एका सुरुंगामुळे दरड कोसळली असावी, असा अंदाज स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत.
बद्रीनाथ महामार्गावरील हेलांग येथील डोंगरावरून दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे. यानंतर प्रशासनानं बद्रीनाथ यात्रा (Badrinath Yatra) थांबवली आहे. महामार्गावर कोसळलेल्या दरडेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अंगावर शहारे आणणारा भयावह व्हिडीओ आहे. पोलिसांनी गौचर (Gauchar), कर्णप्रयाग (Karnaprayag) आणि लंगासूमध्ये (Langasu) बद्रीनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना खबरदारी म्हणून सुरक्षित ठिकाणी थांबण्यास सांगितलं आहे.
#WATCH | Uttarakhand: Badrinath National Highway blocked near Helang village in Chamoli district due to heavy debris coming down from a hill. pic.twitter.com/hjOuRtpIAH
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 4, 2023
बद्रीनाथ महामार्गावर दरड कोसळल्याचा भीषण व्हिडीओ समोर आला आहे. कोसळलेल्या दरडीमुळे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्ग ठप्प झाल्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. यासंदर्भात प्रशासनाकडून माहिती जारी करण्यात आली आहे. कर्णप्रयागचे सीओ अमित कुमार म्हणाले, "हेलांगमधील बद्रीनाथ रस्ता सुरू झाल्यानंतर प्रवाशांना जाण्याची परवानगी दिली जाईल. तोपर्यंत कोणालाही या महामार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी नसेल, सुरक्षेच्या कारणांमुळे वाहतूक पोलिसांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे."
अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ
बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर कोसळलेल्या दरडीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संपूर्ण दगड तुटून महामार्गावर पडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरड कोसळल्याचा व्हिडीओ भयावह आहे. व्हिडीओमधील दृश्य अंगावर शहारे आणणारे आहेत. व्हिडीओमध्ये घटनास्थळी लोकांच्या ओरडण्याचा आवाजही ऐकू येत आहे. व्हिडीओमध्ये घटनास्थळी लोक इकडून तिकडे धावताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दरड कोसळलेल्या ठिकाणी काही प्रवाशांची वाहानंही दिसत आहेत. सुदैवानं याठिकाणी जीवितहानी झालेली नाही.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार मोठी दुर्घटना टळली आहे. बद्रीनाथ महामार्गाच्या ठिकाणी अडकलेल्या भाविकांनी सांगितलं की, "भगवान बद्रीनाथांची भक्तांवर कृपा झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. दरड ज्या प्रकारे कोसळली. त्यामुळे मोठी हानी होऊ शकत होती, पण दुर्घटना टळली आहे."