Dandi March : स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या उत्सवाची सुरुवात, पंतप्रधान मोदी दांडी मार्चला हिरवा झेंडा दाखवणार
देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या उत्सवाची म्हणजेच अमृत महोत्सवाची (Azadi Ka Amrut Mahotsav) सुरुवात आजपासून होणार आहे. या उत्सवाचं सेलिब्रेशन करण्यासाठी 'आजादी का अमृत महोत्सव' देशभरात सुरु करण्यात येणार आहे. या अंतर्गत दांडी मार्चचं (Dandi March) आयोजन केलं जाणार आहे.

नवी दिल्ली: देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या उत्सवाची म्हणजेच अमृत महोत्सवाची सुरुवात आजपासून होणार आहे. या उत्सवाचं सेलिब्रेशन करण्यासाठी 'आजादी का अमृत महोत्सव' देशभरात सुरु करण्यात येणार आहे. या अंतर्गत दांडी मार्चचं (Dandi March) आयोजन केलं जाणार आहे. या मार्चला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या अहमदाबादमध्ये हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पंतप्रधान मोदी दांडी पुलावरुन प्रतिकात्मक दांडी यात्रेमध्येही सहभागी होणार आहे. त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी देखील असणार आहेत.
75 आठवड्यांचा कार्यक्रम
अमृत महोत्सवानिमित्त वेगवेगळ्या 75 ठिकाणी समारंभ होणार असून भाजपच्या खासदारांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बुधवारी झालेल्या बैठकीतही केले होते. पुढील 75 आठवड्यासाठी काही कार्यक्रम तयार असल्याचं आणि काही कार्यक्रम लोकांच्या सल्ल्यानुसार या महोत्सवाच्या अंतर्गत केले जाणार आहेत.
असे असणार कार्यक्रम
'आजादी का अमृत महोत्सव' देशभरात साजरा होणार आहे. यात सायकल आणि बाईक रॅली, विविध स्पर्धा, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आणि ‘आत्मानिर्भर भारत’ या विषयांवर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. हा अमृत महोत्सव साजरा करण्यामागचे उद्दीष्ट म्हणजे मुले, तरुण आणि नागरिकांचा यात जास्तीत जास्त सहभाग होणे आणि महात्मा गांधींचा संदेश पोहोचविणे हा आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती गांधी आश्रमातून ऐतिहासिक दांडी यात्रेच्या पुनर्रचनेला झेंडा दाखवणार आहेत. या दांडी यात्रेत 81 पादचारी साबरमती आश्रमापासून 386 कि.मी. अंतरावर असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणी जाणार आहेत.























